|| प्रशांत केणी

‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया,

हर फ़िक्र को धुंएँ में उडाता चला गया’

साहिर लुधियानवी यांच्या या ओळींप्रमाणेच तो जगला. अगदी पुढल्या ‘बर्बादियों का सोग़ मनाना फिजूल था, बर्बादियों का जश्न मनाता चला गया..’ याही ओळींचा अर्थ त्याच्याकडे पाहून कळावा, असा. त्याच्या जीवनपटाला त्याच्या खेळापासून वेगळं काढताच येत नाही. साधारण १० पावलांची हळुवार धाव घेत तो उजव्या हाताची गिरकी घेऊन चेंडू टाकायचा. उजवा हात हवेत असतानाच चेंडूची दिशा, टप्पा आणि वेग हे लक्ष्याधारित भौमितिक समीकरण ठरलं जायचं. खेळपट्टीवर चेंडू टप्पा पडताच तो कधी ३०, ४५, ६० अशा विविध अंशांमध्ये अनपेक्षितपणे वळायचा. हे वळणं समोरील निष्णात फलंदाजालाही अचंबित करायचं. अपेक्षेप्रमाणे फलंदाजाचा यष्टिभेद किंवा तो पायचीत झाला की बळीप्राप्तीचा आनंदही हा सोनेरी केसांचा अवलिया तितक्याच उत्साहात साजरा करायचा.

शेन वॉर्नच्या लेग-स्पिन गोलंदाजीची ही जादूच न्यारी होती. फिरकी गोलंदाजी हे आशियाई राष्ट्रांचं हुकमी अस्त्र, तर वेगवान मारा ही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या ‘सेना’ राष्ट्रांची खासियत. तरीही कसोटीमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा वॉर्न ७०८ बळींसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. आशियाई अनुकूलतेत ८०० बळी घेणाऱ्या मुथय्या मुरलीधरनपेक्षा वॉर्नचं प्रतिकूल खेळपट्टय़ांवरील यश अधिक आकर्षक ठरतं. त्याच्या एकूण बळीसंख्येचं वर्गीकरण केल्यास १९५ बळी हे अ‍ॅशेसमधील आहेत. त्याच्या भात्यातील फिरकी गोलंदाजीचं वैविध्य व नजाकतीमुळेच ‘फिरकीचा जादूगार’ असं त्याला कौतुकानं म्हणू लागले. याच फिरकी अदाकारीमुळे भारतीयांना तो आपलासा वाटायचा.

वॉर्नचं पदार्पण १९९२मध्ये भारतात झालं. याच भारतात २००८मध्ये पहिल्या ‘आयपीएल’चं जेतेपद राजस्थान रॉयल्सला त्यानं जिंकून दिलं. पण वॉर्ननं १९९३च्या अ‍ॅशेस मालिकेत प्रथमच क्रिकेटजगताचं लक्ष वेधलं. इंग्लंडविरुद्धच्या सहा कसोटी सामन्यांच्या मालिकेत वॉर्नच्या खात्यावर ३४ बळी जमा होते. या मालिकेतील त्याच्या पहिल्याच चेंडूनं क्रिकेट इतिहासात अभिजात स्थान मिळवलं. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज माइक गेटिंगचा त्रिफळा उद्ध्वस्त करणाऱ्या त्या वळणदार चेंडूला ‘शतकातील सर्वोत्तम चेंडू’ म्हणून गौरवण्यात आलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकीकडे लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ असतानाच आपल्या उच्छृंखल स्वभावामुळे त्याची कारकीर्द डागाळली. बिनधास्त जगत मैदानातील आणि मैदानाबाहेरील वादांमुळे ‘क्रिकेटमधील बॅड बॉय’ म्हणून तो चर्चेत राहिला.

वॉर्नचं नाव सामनानिश्चिती आणि उत्तेजकांचं सेवन या दोन्हीमध्ये गोवलं गेलं. १९९४मधील श्रीलंका दौऱ्यात खेळपट्टी आणि वातावरणाची माहिती देण्यासाठी एका भारतीय सट्टेबाजाकडून लाच घेतल्याचं वॉर्न आणि मार्क वॉ यांनी १९९८मध्ये मान्य केलं. या कृतीबद्दल ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघटनेने त्यांच्यावर कारवाई केली. मग उत्तेजकांचं सेवन केल्याप्रकरणी २००३च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेआधी त्याला मायदेशी धाडण्यात आलं. ‘तजेलदार चेहऱ्यासाठी आईनं औषध दिलं होतं’ असं त्याचं यावरचं स्पष्टीकरण! बेफिकिरीचा याहून पुरावा काय हवा? याच वॉर्ननं ‘धूम्रपानमुक्तीचा अक्सीर इलाज’ विकणाऱ्या कुणा कंपनीशी प्रचाराचा करारही केला. पण त्याहीनंतर तो स्वत:च धूम्रपान करतानाचं छायाचित्र काही तरुण पोरांनी काढलं, तर तो त्यांच्याशीच हुज्जत घालू लागला.

वॉर्नचं अनेक नावाजलेल्या सौंदर्यवतींशी नाव जोडलं गेलं. एका वेळी अनेक मैत्रिणींशी प्रेमसंबंध जपण्यातही वॉर्न पटाईत होता. १९९५मध्ये त्यानं योगा शिक्षिका सिमॉन कॉलाहनशी विवाह केला. परंतु वॉर्नच्या बहुस्त्रीसंबंध धोरणामुळे २००५मध्ये तिनं घटस्फोट घेतला. मग त्याचं लॉरा सेयर्स आणि केरी कॉलीमोर यांच्याशी संबंध जोडले गेले. वॉर्ननं हजारांहून अधिक महिलांशी लैंगिक संबंध ठेवल्याचा दावा २००६मध्ये लेखक पॉल बेरी यांनी केला होता. याबाबत वॉर्नला माध्यमांसमोर खुलासा करावा लागला होता. २०००मध्ये एका ब्रिटिश रुग्णसेविकेला कामुक संदेश पाठवल्याप्रकरणी वॉर्नला उपकर्णधारपद गमवावं लागलं होतं. ब्रिटिश अभिनेत्री एलिझाबेथ हर्लीशी त्याचे प्रेमसंबंध गाजले. जे दीर्घकाळ टिकले. पण हे सुरू असतानाच आफ्रिकेमधील एका महिलेनं विनयभंगाचा आरोपही त्याच्यावर केला होता. २००६मध्ये वॉर्नचं नाव एका ‘सेक्स स्कँडल’मध्येही प्रकाशात आलं होतं. याचप्रमाणे ‘एम-टीव्ही’वरील सूत्रसंचालक कोराली आयकॉल्झ आणि एम्मा यांच्यासोबतचं वादग्रस्त छायाचित्र ब्रिटनमधील एका नामांकित मासिकानं छापून खळबळ माजवली होती. २०१६मध्ये वॉर्नच्या नातेसंबंधांवर आधारित एका चित्रपटाचीही घोषणा झाली. परंतु प्राथमिक टप्प्यातच ही योजना बारगळली.

२०१३मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतरही वॉर्न माध्यमांच्या चर्चेत राहिला. २०१६मध्ये वॉर्ननं ‘आय अ‍ॅम अ सेलिब्रिटी, गेट मी आऊट ऑफ हिअर’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये उत्क्रांतीच्या सिद्धांतावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि वर मानवाची उत्क्रांती एलियन्सपासून म्हणजेच परग्रहावरील जिवांपासून झाल्याचा दावा केला होता. मात्र दुसरीकडे, ‘शेन वॉर्न फाऊंडेशन’द्वारे दुर्धर आजारी आणि तळागाळातल्या मुलांसाठी सामाजिक कार्यही केलं.

मागील शतकातील सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूंमध्ये आपलं स्थान अधोरेखित करणाऱ्या वॉर्ननं शुक्रवारी वयाच्या ५२व्या वर्षी जग सोडल्यानं सर्वानाच हळहळ वाटली. रगेल आणि रंगेल वॉर्न आपल्या फिरकी गोलंदाजीमुळे मात्र अजरामर राहील!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

prashant.keni@expressindia.com