दोषींवर कारवाई का केली नाही?

स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात सहभागी खेळाडूंची बीसीसीआयचे पायउतार झालेले अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी माहिती होती. मात्र तरीही त्यांनी या खेळाडूंवर कारवाई का केली नाही. याचे त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे अशी परखड टीका भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी केली आहे.

स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात सहभागी खेळाडूंची बीसीसीआयचे पायउतार झालेले अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी माहिती होती. मात्र तरीही त्यांनी या खेळाडूंवर कारवाई का केली नाही. याचे त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे अशी परखड टीका भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणात श्रीनिवासन यांचे मौन अनाकलनीय आहे असे त्यांनी सांगितले. स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणात दोषी आढळलेला श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन याच्यावर कठोर कारवाई व्हावी असेही त्यांनी सांगितले.
मुदगल समितीच्या अहवालानुसार श्रीनिवासन यांना बेटिंगबाबत कल्पना होती. मात्र त्यांनी संबंधितांवर कोणतीही कारवाई केली नाही. काही विशिष्ट खेळाडू फिक्सिंगप्रकरणी दोषी होते तर त्यांनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही याचे स्पष्टीकरण श्रीनिवासन यांनी द्यायला हवे अशी भूमिका गावस्कर यांनी मांडली. पंतप्रधान मोदी यांच्यासमेवत आयोजित एका विशेष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गावस्कर ऑस्ट्रेलियात आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
सट्टेबाजी-फिक्सिंग अशा खेळाची प्रतिमा मलिन करणाऱ्या गुन्ह्य़ातील दोषींवर सक्त कारवाई व्हावी. अशाप्रकरणी दोषी आढळलेल्या खेळाडूंना तुरुंगवासाची शिक्षा व्हावी आणि आकडेवारीतून त्याची कामगिरी रद्दबातल करावी असे त्यांनी सांगितले. सट्टेबाजीप्रकरणी दोषी व्यक्तींना तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा कायदा न्यूझीलंडमध्ये पारित करण्यात आला आहे. भारतातही अशा स्वरुपाच्या कायद्याची आवश्यकता आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. हे गैरप्रकार टाळण्यासाठी सरकारने बेटिंग कायदेशीर करावे असा प्रस्ताव गावस्कर यांनी सुचवला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sunil gavaskar blame n srinivasan

ताज्या बातम्या