Sunil Gavaskar Gift For Shubman Gill: कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखाली ओव्हल कसोटीत टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे. संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी पार पाडताना गिलने बॅटने देखील आपली छाप पाडली आहे. गिलने आपल्या विस्फोटक फलंदाजीने या सामन्यात एकापेक्षा एक विक्रम आपल्या नावे केले आहेत. तर कर्णधार आणि फलंदाज म्हणूनही दिग्गज सुनील गावस्करांचे कसोटी क्रिकेटमधील काही विक्रम मोडले आहेत. आता तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर गावस्कर आणि गिल यांचा एक व्हीडिओ समोर येत आहे.
शुबमन गिलने इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत तब्बल ७५४ धावा केल्या आहेत. शुबमन गिलकडे एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज हा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी त्याच्याकडे होती. हा विक्रम दिग्गज सुनील गावस्करांच्या नावे आहे, ज्यांनी एका मालिकेत सर्वाधिक ७७४ धावा केल्या आहेत. पण गिल दुसऱ्या डावात ११ धावांवर बाद झाल्याने हा विक्रम करण्यात अपयशी ठरला.
शुबमन गिलला सुनील गावस्करांनी काय भेट दिली?
शुबमन गिल ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सुनील गावस्करांचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडणार अशी खात्री खुद्द गावस्करांना होती. यासाठी त्यांनी आधीच तयारी करत गिलसाठी खास भेटवस्तू आणली होती आणि त्यांचा विक्रम कर्णधाराने मोडल्यानंतर ते त्याला देणार होते. पण गिल विक्रम मोडण्याआधीच बाद झाला असला तरी त्यांनी गिफ्ट मात्र त्याला दिलं. या व्हीडिओमध्ये गावस्कर गिलबरोबर बोलत असताना गिल अचानक खाली वाकतो. त्यामुळे तो गावस्करांच्या पाया पडत आहे का असा समज झाला, पण मैदानावर गावस्करांच्या पायाजवळ काहीतरी पडलेलं असत ते गिल उचलतो आणि त्याच्या खिशात ठेवतो.
सोनी स्पोर्ट्सने शेअर केलेल्या या व्हीडिओमध्ये गावस्कर आणि शुबमन गिल यांच्यात काय संवाद झाला, पाहूया.
सुनील गावस्कर: छान खेळलायस. तू माझा विक्रम मोडशील असं ठरवून मी आधीच तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं होतं. पण तू पुढच्या मालिकेसाठी हे राखून ठेवलं आहेस.
शुबमन गिल: थँक्यू सर, हो सर.
सुनील गावस्कर: हे छोटंसं गिफ्ट आहे. SG (SG म्हणजे सुनील गावस्कर) अक्षरं असलेलं शर्ट आहे, जे माझ्यासाठी एकाने बनवलं होतं ते तुला देतोय. तुला फिट होईल की नाही कल्पना नाही. ही एक छोटीशी टोपी आहे, माझी सही असलेली ही टोपी आहे, जी मी फार कमी जणांना देतो.
शुबमन गिल: खूप खूप धन्यवाद सर, मी माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.
सुनील गावस्कर: हे घे ऑल द बेस्ट आणि शेवटची ट्रिक कमाल होती. क्षेत्ररक्षक एकिकडे लावला आणि यॉर्कर टाकला. कमाल, ऑल द बेस्ट. उद्या मी माझं लकी जॅकेट घालणार आहे. जे मी ऑस्ट्रेलियामध्ये घातलं होतं, पांढर जॅकेट आहे जे मी अखेरच्या दिवसासाठी ठेवलं होतं. परत एकदा शुभेच्छा.
शुबमन गिलने अखेरीस त्यांना हात मिळवत त्यांचे आभार मानले आणि सुनील गावस्करांनी चौथ्या दिवसासाठी आणि सामना जिंकण्यासाठी भारताला शुभेच्छा दिल्या. भारताला आता विजयासाठी ९ विकेट्सची गरज असून अद्याप ३२४ धावांची आघाडी संघाकडे आहे.