Sunil Gavaskar on IND vs ENG Lord’s Test : इंग्लंडमध्ये सध्या भारत व इंग्लंड संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका चालू आहे. यापैकी तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या दोन सामन्यांपैकी एक सामना भारताने व एक इंग्लंडने जिंकला होता. दरम्यान, तिसऱ्या सामन्यात यजमान इंग्लंडने आपला गड राखत लॉर्ड्सच्या मैदानावर २२ धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने या मालिकेत २-१ ने आघाडी मिळवली आहे. या सामन्यातील पाचव्या दिवशी एकटा रवींद्र जडेजा शेवटपर्यंत लढला. पण त्याला इतर फलंदाजांकडून पुरेशी साथ मिळाली नाही.

या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघासमोर विजयासाठी १९३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना भारताच्या प्रमुख फलंदाजांनी नांग्या टाकल्या. परंतु, भारताच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी शेवटपर्यंत झुंज दिली. रवींद्र जडेजा शेवटचा गडी बाद होईपर्यंत मैदानात नांगर टाकून उभा राहिला. परंतु, भारताला हा सामना २२ धावांनी गमवावा लागला आहे. भारताचा दुसरा डाव १७० धावांवर आटोपला.

दरम्यान, अनेक आजी-माजी खेळाडू, क्रीडा समीक्षक या सामन्याचं आपापल्या परिने विश्लेषण करत आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी देखील या सामन्याबाबत त्यांचं मत व्यक्त केलं आहे. भारतीय फलंदाज मोठी भागिदारी रचण्यात अपयशी ठरल्यामुळेच आपल्याला हा पराभव पाहावा लागला, असं गावसकर म्हणाले.

रवींद्र जडेजाला त्याच्या कामगिरीसाठी पूर्ण गुण द्यायला हवेत : गावसकर

माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर म्हणाले, “एखादी ६० ते ७० धावांची भागिदारी झाली असती, तर त्यामुळे मोठा फरक पडला असता. परंतु, भारतीय फलंदाजांना ते जमलं नाही. तुम्ही असं म्हणू शकता की जो रूट व शोएब बशीर गोलंदाजी करत असताना जडेजाने थोडा धोका पत्करून मोठे फटके खेळले असते तर आपण जिंकू शकलो असतो. परंतु, त्याने जे काही केलं त्यासाठी त्याला पूर्ण गुण द्यायला हवेत.” गावसकर सोनी स्पोर्ट्सवर बोलत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचा २२ धावांनी पराभव

या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडने ३८७ तर भारतानेही पहिल्या डावात ३८७ धावा केल्या होत्या. तर, इंग्लंडने दुसऱ्या डावात १९२ धावा जमवल्या. त्यानंतर १९३ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताचा डाव १७० धावांवर आटोपला.