भारतीय संघाने लीड्स कसोटीत धावांचा पाऊस पाडत इंग्लंडविरूद्ध मोठी धावसंख्या रचण्याच्या दिशेने आहेत. दुसऱ्या दिवशी भारताचा नवा कसोटी उपकर्णधार ऋषभ पंतने दणदणीत शतक झळकावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ऋषभ पंत १३५ धावांची उत्कृष्ट खेळी करत बाद होऊन माघारी परतला. पण तोपर्यंत भारताची धावसंख्या ४५०च्या पार पोहोचली होती. ऋषभ पंतला स्टुपिड म्हणणाऱ्या गावस्करांनी मात्र पंतचं शतकानंतर कौतुक केलं आहे.
लीड्समध्ये इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात, भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने शानदार शतक झळकावलं. पंतने त्याचे शतक पूर्ण करताच कमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित असलेले भारतीय क्रिकेटचे दिग्गज खेळाडू सुनील गावस्करही त्यांचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. या सामन्याच्या पहिल्या डावात ऋषभ पंतने १४६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले, ज्यामध्ये १० चौकार आणि ४ षटकारांसह त्याने उत्कृष्ट खेळी केली.
ऋषभ पंत त्याच्या आक्रमक आणि विचित्र फटके खेळत चौकार-षटकारांची लयलूट करण्यासाठी ओळखला जातो. अशा खेळण्यामुळे तो काही वेळा बाद झाला आहे. गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चुकीचा फटका खेळत ऋषभ पंत झेलबाद होता आणि तेव्हा तो मैदानावर राहण्याची संघाला सर्वाधिक गरज होती. ऋषभ पंत ज्या प्रकारे बाद झाला होता, ते पाहून भारताचे माजी फलंदाजी सुनी गावस्कर संतापले होते आणि त्यांनी कॉमेंट्री करताना स्टुपिड स्टुपिड असं ३ वेळा म्हटलं होते. हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
लीड्सच्या मैदानावर ऋषभ पंतने समजूतदारपणे क्रिकेट खेळत शतक पूर्ण केले. सुरुवातीला त्याने वेळ घेतला आणि नंतर मोठे शॉट्स खेळले. पंतने लीड्समध्ये शतक पूर्ण करताच संपूर्ण स्टेडियम एकच जल्लोष पाहायला मिळाला. त्यादरम्यान, कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित असलेले गावस्कर उत्साहात म्हणाले, Superb Super Superb. गावस्करांबरोबर उपस्थित असलेले हर्षा भोगलेही त्यांचं बोलणं ऐकून आनंदाने हसत होते.
गावस्कर यांनी केलेली ही प्रशंसा पंतसाठी नक्कीच मोठी गोष्ट आहे. पंतच्या खेळीची आणि गावस्करच्या टिप्पणीची सोशल मीडियावरही खूप चर्चा होत आहे. चाहते पंतचे कौतुक करत आहेत आणि पंत या शतकी खेळीसह भारताचा सर्वात यशस्वी विकेटकिपर फलंदाज आहे, त्याने धोनीला मागे टाकत नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. पंतने या डावात एकूण १३४ धावांची खेळी केली.