Sunil Gavaskar Warns India Women’s World Champion Team: भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच विश्वचषकाचं जेतेपद पटकावलं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघाचा पराभव करत पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला. भारतीय महिला संघाच्या या कामगिरीनंतर संघावर कौतुकांचा पुरस्कारांचा वर्षाव होत आहे आणि खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. यादरम्यान गावस्करांनी महिला संघातील खेळाडूंना एक मोठा सल्ला दिला.
ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाचा जल्लोष उसळला. वर्ल्ड चॅम्पियन महिला संघाच्या यशाचा गौरव करण्यासाठी बीसीसीआयने ५१ कोटी रुपयांच्या रोख पारितोषिकाची घोषणा केली, ज्यात आयसीसीकडून मिळालेल्या ४० कोटी रुपयांच्या पुरस्काराचीही भर होती. याशिवाय, विविध राज्य सरकारांनी ऋचा घोष, हरमनप्रीत कौर, स्मृती मानधाना आणि हरलीन देओल यांसारख्या खेळाडूंना स्वतंत्र सन्मान आणि पुरस्कार जाहीर केले आहेत. मात्र, दिग्गज सुनील गावस्कर यांनी खेळाडूंना इशारा दिला आहे की, ‘फार अपेक्षा ठेवू नका,’ कारण अशा क्षणांनंतर मिळणारा गौरव टिकवणंही तितकंच अवघड असतं.
गावस्करांनी मिड-डेमधील त्यांच्या स्तंभलेखात महिला संघाला सांगितलंय, “मुलींसाठी फक्त एक इशारा. जर तुम्हाला वचनं दिलेली काही बक्षिसं मिळाली नाहीत तर निराश होऊ नका. भारतातील जाहिरातदार किंवा ब्रँड पटकन शर्यतीत सामील होतात आणि विजेत्यांच्या खांद्यावर मोफत प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही संघाचे अभिनंदन करणाऱ्या पूर्ण पानाच्या जाहिराती आणि होर्डिंग्जवर एक नजर टाकली तर हे स्पष्ट होतं की ते फक्त त्यांच्या ब्रँडचा किंवा स्वतःचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत,पण भारतीय क्रिकेटसाठी एवढी मोठी कामगिरी करणाऱ्यांना काहीच देत नाहीत.
गावस्कर यांनी वैयक्तिक अनुभवाच्या आधारे हा इशारा दिला. १९८३ मध्ये भारतीय संघाने पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर, त्यांना अनेक आश्वासने देण्यात आली होती जी आजपर्यंत पूर्ण झालेली नाहीत. याबाबत पुढे बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, “१९८३ मधील वर्ल्डकप विजेत्या संघाकरता त्या वेळी बऱ्याच आश्वासनांचा पाऊस पडला होता आणि माध्यमांमध्येही प्रचंड गाजावाजा झाला होता. पण त्यापैकी जवळजवळ काहीच प्रत्यक्षात आलं नाही.”
“माध्यमांना त्यासाठी दोष देता येणार नाही, कारण ती लोकं फक्त झालेल्या मोठमोठ्या घोषणा प्रसिद्ध करत होती, त्यांना हेही कळलं नाही की त्यांचाही वापर हे असे लोक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करत आहेत. म्हणूनच, मुलींनो, जर हे निर्लज्ज लोक तुमच्या विजयाचा वापर स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी करत असतील, तर त्याबद्दल फार काळजी करू नका,” असा सल्ला गावस्करांनी दिला.
