गेल्या वर्षी भारतात झालेल्या चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत वादग्रस्त गोलंदाजीच्या शैलीचा दोनदा ठपका ठेवण्यात आलेला ऑफ-स्पिनर सुनील नरिनचा वेस्ट इंडिजच्या विश्वचषक संघात समावेश करण्यात आले आहे. या १५ सदस्यीय संघातून माजी कर्णधार ड्वेन ब्राव्हो आणि किरॉन पोलार्ड यांना मात्र वगळण्यात आले आहे.
नरिनवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास मज्जाव करण्यात आलेला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) स्पध्रेतून मात्र त्याला निलंबित करण्यात आले होते. नरिन आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील पहिल्याच विश्वचषक स्पध्रेत तो आता खेळणार आहे.
दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेत नेतृत्व करणाऱ्या अष्टपैलू जेसॉन होल्डरकडेच कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. सलामीवीर ख्रिस गेल हा या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. मार्लन सॅम्युअल्सकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
वेस्ट इंडिजचा संघ
जेसॉन होल्डर (कर्णधार), मार्लन सॅम्युअल्स, सुलेमान बेन, डॅरेन ब्राव्हो, जोनाथन कार्टर, शेल्डॉन कॉट्रेल, ख्रिस गेल, सुनील नरिन, दिनेश रामदिन, केमार रोच, आंद्रे रसेल, डॅरेन सॅमी, लेंडल सिमॉन्स, ड्वेन स्मिथ, जेरॉम टेलर.