आतापर्यंत सातत्यपूर्ण दमदार कामगिरी करता न आलेल्या सनराझर्स हैदराबादचा संघ युवराज सिंगच्या प्रतीक्षेत आहे. दुखापतीमुळे आतापर्यंत युवराजला एकही सामना खेळता आला नव्हता. पण त्याच्यासारखा एकहाती सामना जिंकवून देणारा खेळाडू संघात आल्यावर हैदराबादचे मनोबल कमालीचे उंचावले असेल. दुसरीकडे अव्वल स्थान गमावलेला गुजरात लायन्सच्या संघाची गाडीही अडखळत असून ते विजयाच्या वाटेवर येण्यासाठी आतूर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरातने स्पर्धेची धडाकेबाज सुरुवात केली होती, पण त्यांना किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून सलग पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा असेल. कारण या विजयासह त्यांना पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवता येऊ शकेल. आरोन फिंच, ड्वेन स्मिथ आणि ब्रेंडन मॅक्क्युलम यांच्यावर गुजरातची फलंदाजी अवलंबून असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे जेव्हा या तिघांपैकी एकही फलंदाज जास्त धावा करत नाही तेव्हा गुजरातला पराभवाची चव चाखायला मिळते. कर्णधार सुरेश रैनाला अजूनही सूर गवसलेला नाही. रवींद्र जडेजा चांगली गोलंदाजी करत असला तरी त्याला फलंदाजीमध्ये चमक दाखवता आलेली नाही.

स्पर्धेच्या सुरुवातीला हैदराबादच्या संघाला काही धक्के बसले होते. सध्याच्या घडीलाही त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये योग्य समन्वय पाहायला मिळत नाही. गेल्या सामन्यात त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर १५ धावांनी विजय मिळवला होता. फलंदाजीमध्ये कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आतापर्यंत काही चांगल्या खेळी साकारल्या आहेत. फलंदाजीमध्ये दीपक हुडा, नमन ओझा आणि मोइसेस हेन्रिक्स यांनी चांगली कामगिरी केली आहे. सलामीवीर शिखर धवनला मात्र छाप पाडता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये मिस्तफिझूर रेहमान, आशीष नेहरा आणि भुवनेश्वर कुमार यांच्याकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे.

या दोन्ही संघांमध्ये २१ एप्रिलला पहिला सामना झाला होता आणि या सामन्यात हैदराबादने गुजरातला दहा विकेट्स राखून पराभूत केले होते. हा विजय आणि युवराजचे मैदानावर उतरणे, या दोन गोष्टी हैदराबादसाठी महत्त्वाच्या आहेत. पण गुजरातच्या संघामध्ये कोणत्याही संघाला धूळ चारण्याची धमक आहे. त्यामुळे पराभवाचा वचपा काढण्यासाठी गुजरातचा संघ प्रयत्नशील असेल.

संघ

सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), शिखर धवन, केन विल्यमसन, आदित्य तरे, रिकी भूई, ट्रेंट बोल्ट, मोझेस हेनरिक्स, अभिमन्यू मिथुन, सिद्धार्थ कौल, मुस्तफिझुर रेहमान, नमन ओझा, कर्ण शर्मा, युवराज सिंग, आशीष नेहरा, टी. सुमन, आशीष रेड्डी, बिपुल शर्मा, बेन कटिंग, भुवनेश्वर कुमार, ईऑन मॉर्गन, विजय शंकर, बरिंदर सरण.

गुजरात लायन्स : सुरेश रैना (कर्णधार), ड्वेन ब्राव्हो, जेम्स फॉकनर, आरोन फिन्च, ब्रेंडन मॅक्क्युलम, ड्वेन स्मिथ, डेल स्टेन, प्रवीण तांबे, इशन किशन, रवींद्र जडेजा, शदाब जाकाती, दिनेश कार्तिक, शिविल कौशिक, धवल कुलकर्णी, प्रवीण कुमार, प्रदीप सांगवान, जयदेव शाह, उमंग शर्मा, अ‍ॅड्रय़ू टाय, सरबजित लड्डा, अक्षदीप नाथ, अमित मिश्रा, पारस डोग्रा, एकलव्य द्विवेदी.

  • वेळ : रात्री ८ वाजल्यापासून. 
  • प्रक्षेपण : सोनी सिक्स आणि सेट मॅक्सवर.
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunrisers hyderabad vs gujarat lions match
First published on: 06-05-2016 at 06:06 IST