scorecardresearch

सुपरबेट पोलंड बुद्धिबळ स्पर्धा : आनंद संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी

भारताचा पाच वेळा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने सुपरबेट जलद (रॅपिड) आणि अतिजलद (ब्लिट्झ) पोलंड बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्तरीत्या दुसरे स्थान मिळवले.

पीटीआय, वॉरसॉ : भारताचा पाच वेळा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने सुपरबेट जलद (रॅपिड) आणि अतिजलद (ब्लिट्झ) पोलंड बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्तरीत्या दुसरे स्थान मिळवले. ५२ वर्षीय आनंदने अतिजलद विभागात सोमवारी तीन विजयांची नोंद केली. त्याने २७व्या आणि अखेरच्या फेरीत रादोस्लाव्ह वोस्ताजेकला (पोलंड) पराभूत केले. तसेच त्याने रिचर्ड रॅपपोर्ट (हंगेरी) आणि किरिल शिव्हचेंको (युक्रेन) यांच्यावरही मात केली. मात्र, त्याला तीन सामन्यांत बरोबरीवर समाधान मानावे लागले आणि त्याने तीन सामने गमावले. त्यामुळे या स्पर्धेच्या जेतेपदापासून त्याला वंचित राहावे लागले.

पोलंडच्या यान-क्रिस्टोफ डुडाने २४ गुणांसह या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. त्याने जलद आणि अतिजलद या दोन्ही विभागांत प्रत्येकी १२ गुण मिळवले. डुडाने अतिजलद विभागात किरिल शिव्हचेंकोवर निर्णायक विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली. आनंदला अर्मेनियाच्या लेव्हॉन अरोनियनसह संयुक्तरीत्या दुसरे स्थान मिळाले. या दोघांच्याही खात्यावर २३.५ गुण होते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Superbate poland chess tournament anand joint second place world champion chess player ysh

ताज्या बातम्या