तिसऱ्या वनडेदरम्यान श्रेयसला दुखापत झाल्याचं कळलं. सामना संपताक्षणी त्याला कॉल आला पण त्याचा रिप्लाय आला नाही असं भारताचा टी२० कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितलं. तिसऱ्या वनडेदरम्यान अॅलेक्स कॅरेचा कॅच पकडताना श्रेयसच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाली होती. अंतर्गत रक्तस्रावामुळे त्याला आयसीयूतमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून, त्याची तब्येत स्थिर आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

‘मला दुखापतीचं कळलं, मी लगेचच त्याला कॉल केला. पण फोन त्याच्याकडे नसल्याचं माझ्या लक्षात आलं. कारण त्याचा रिप्लाय आला नाही. मग मी फिजिओ कमलेश जैन यांना कॉल केला. त्यांनी मला सविस्तर माहिती दिली. श्रेयसशी बोलणं होऊ शकलं नाही पण तो मेसेजच्या माध्यमातून माझ्याशी संपर्कात आहे. ज्याअर्थी तो मेसेजवर रिप्लाय करतो आहे, त्यार्थी त्याची तब्येत आता स्थिर आहे. डॉक्टर त्याची योग्य काळजी घेत आहेत. बीसीसीआयची मेडिकल टीमचंही लक्ष आहे. देखरेखीसाठी त्याला काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवणार आहेत. तो आम्हा सगळ्यांच्या संपर्कात आहे. काळजीचं कारण नाही’, असं सूर्यकुमारने सांगितलं. टी२० मालिकेतील पहिला सामना कॅनबेरा इथल्या मनुका ओव्हल इथे होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सूर्यकुमार पत्रकारांशी बोलत होता.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, श्रेयसला सिडनीतील हॉस्पिटलमधल्या आयसीतून बाहेर सोडण्यात आलं आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याला बरं होण्यासाठी आणखी काही दिवस लागतील असं बीसीसीआयमधील सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितलं.

श्रेयसच्या आईवडिलांना तातडीने व्हिसा देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली होती. मात्र श्रेयसवर सर्वोत्तम डॉक्टर उपचार करत आहेत. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. लवकरच तो मायदेशी परतेल असं श्रेयसच्या वडिलांनी डेक्कन क्रोनिकलशी बोलताना सांगितलं. श्रेयस टी२० संघाचा भाग नव्हता त्यामुळे वनडे मालिकेनंतर तो मायदेशी परतणार होता. मात्र या दुखापतीमुळे त्याचा ऑस्ट्रेलियातला मुक्काम वाढला आहे.

कशी झाली दुखापत?

सिडनीमधील मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरच्या बरगडीला दुखापत झाली. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या ३४ व्या षटकात हर्षित राणाच्या गोलंदाजीवर एलेक्स कॅरीला बाद करण्यासाठी झेल घेण्याच्या प्रयत्नात त्याला ही दुखापत झाली. बॅकवर्ड पॉइंटवर उभा असलेला श्रेयस अय्यर चेंडू हवेत जाताच त्याने पाहिलं आणि तो मागच्या दिशेने धावत गेला आणि त्याने यशस्वीपणे झेल घेतला.

पण झेल टिपल्यानंतर ज्या वेगाने तो धावत आला, त्यामुळे तो थेट मैदानावर कोसळला. मैदानावर पडत असताना चेंडू त्याच्या हातातून निसटणार होता जो त्याने शरीराकडे घट्ट पकडला, यादरम्यान तो त्याच्या डाव्या कुशीवर मैदानात आदळला. जमिनीवर पडताच श्रेयस वेदनेने कळवळताना दिसला. त्याने उठायचा प्रयत्न केला, पण त्याला ताठ उभं राहता येईन. फिजिओने तपासल्यानंतर श्रेयस मैदानाबाहेर गेला आणि त्याची दुखापत पाहता त्याला थेट रूग्णालयात नेण्यात आलं.

श्रेयसला नेमकं काय झालं?

श्रेयसच्या बरगड्यांमधल्या प्लीहा या अवयवाला दुखापत झाली आहे. प्लीहा डाव्या बाजूला नवव्या आणि बाराव्या बरगड्यांदरम्यान असतो. त्याचा आकार मुठीएवढा असतो. प्लीहाद्वारे रक्ताभिसरण आणि प्रतिकारक क्षमता यांना मदत केली जाते. जुन्या लाल रक्तपेशींना आटोक्यात आणणे आणि आपात्कालीन परिस्थितीसाठी रक्ताचा साठा करून ठेवणे यामध्ये प्लीहाची भूमिका महत्त्वाची असते. प्लीहाच्या अभावी काही रोगांचे संक्रमण होऊ शकते.

दुखापत झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये आणण्यात आलेल्या श्रेयसची शुद्ध हरपली होती. यानंतर श्रेयसला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तातडीने उपचार केले. अंतर्गत रक्तस्रावामुळे संसर्ग वाढू नये यासाठी त्याचे रुग्णालयात राहून उपचार आणि विश्रांती घेणे आवश्यक आहे.