Suryakumar Yadav Instagram Story For Rishabh Pant: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतरही मालिकेत यजमान संघ २-१ ने पुढे आहे. पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. हा कसोटी सामना ३१ जुलैपासून सुरू होईल. पण या सामन्यापूर्वी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत स्पर्धेबाहेर झाला आहे. त्याच्या जागी नव्या खेळाडूला संघात सामील केलं आहे.
मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंत फलंदाजी करत असताना ख्रिस वोक्सच्या चेंडूवर स्वीप खेळायला गेला आणि चेंडू त्याच्या उजव्या पायाला लागला. यानंतर पंत वेदनेने कळवळताना दिसला. त्याच्या पायाला इतक्या वेदना होत होत्या की तो जमिनीवर पाय देखील ठेवू शकत नव्हता. क्षणार्धात त्याचा पाय देखील सुजला. यानंतर लगेच कार्टमधून त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं.
मैदानाबाहेर गेल्यानंतर पंतला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं आणि स्कॅन करण्यात आलं. यामध्ये त्याचा पाय फॅक्चर झाला होता. पाय फ्रॅक्चर झालेला असतानाही पंत दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला. विकेटदरम्यान धावतानाही त्याला त्रास होत होता, पण तरीही त्याने जिद्दीने फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं. आता सूर्यकुमार यादवनेही त्याचं कौतुक केलं आहे.
सूर्यकुमार यादवची ऋषभ पंतसाठी खास पोस्ट
बीसीसीआयने चौथी कसोटी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये भारताचा कोच गौतम गंभीर ऋषभ पंतचं कौतुक करताना दिसत आहे आणि संपूर्ण संघ टाळ्या वाजवत त्याला दाद देत आहेत. हा व्हीडिओ सूर्याने शेअर करत पंतचं कौतुक केलं आहे.
सूर्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये गौतम गंभीरचं नावं घेतलं आहे. त्यानंतर खाली त्याने ऋषभ पंतला टॅग करत लिहिलं, “मला माहितीये तू वेडा होतास पण पूर्ण वेडा आहेस ते आता कळलं.” यानंतर खाली हॅशटॅगमध्ये लिहिलं, #झुकेगानही आणि पुढे नजर न लागण्याचा इमोजी वापरला आहे. सूर्यादादाची ही भन्नाट इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आहे.


यानंतर सूर्याने पुढच्या स्टोरीमध्ये ध्रुव जुरेलचा फोटो शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे. प्लेईंग इलेव्हनचा भाग नसतानाही फक्त यष्टीरक्षणासाठी मैदानावर येणं सोपं नसतं, असं म्हणत सूर्याने त्याचं कौतुक केलं आहे.