Suryakumar Yadav Mother Heartwarming Video: भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर सध्या सिडनीमधील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. २५ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात फिल्डिंग करताना त्याला दुखापत झाली. श्रेयसची दुखापत गंभीर असल्याने त्याला तातडीने रूग्णालयात दाखल केलं आणि त्यानंतर त्याला आयसीयूमध्येही ठेवण्यात आलं. दरम्यान सूर्यकुमार यादवच्या आईने श्रेयस अय्यर लवकर ठिक व्हावा यासाठी पूजा केली.
श्रेयसने फिल्डिंग करताना मागच्या दिशेने धावत जाऊन एक कमालीचा झेल टिपला पण तो डाव्या बाजूवर मैदानावर कोसळला आणि त्याच्या बरगडीला दुखापत झाली. बरगडीला प्रचंड फटका बसल्यानंतर त्याच्या धमणीला दुखापत झाली आणि त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होत असल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल केलं. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर श्रेयसला आयसीयूमधून बाहेर आणण्यात आलं. पण यानंतरही तो हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली असणार आहे.
श्रेयस अय्यरला मैदानावर झालेली ही गंभीर दुखापत पाहता सर्वच जण तो लवकर बरा व्हावा यासाठी त्याला शुभेच्छा देत आहेत. पण यादरम्यान सूर्यकुमार यादवच्या आईने श्रेयस अय्यरसाठी खास पूजा केली आहे. श्रेयसच्या बहिणीने इन्स्टाग्रामवर व्हीडिओ शेअर केला आहे, जो आता व्हायरल होत आहे.
सूर्यकुमार यादवच्या आईने छठ पूजेच्या वेळी श्रेयस अय्यर लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली. दिनलने शेअर केलेल्या या व्हीडिओमध्ये सूर्याची आई म्हणताना दिसत आहे की, “श्रेयस अय्यरच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून मी सर्वांना प्रार्थना करायला सांगू इच्छिते, कारण काल मी ऐकलं की त्याला बरं वाटत नाहीये. त्यामुळे तो त्याच्या आईकडे बरा होऊन लवकर परत येऊदे.”

बीसीसीआयने काल एक प्रेस रिलीज जारी करून अय्यरच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. बोर्डाने म्हटलं आहे की, २५ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान अय्यरला पोटाच्या भागात गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव देखील झाला होता. दुखापतीचं लगेच निदान झाल्याने रक्तस्त्राव थांबवण्यात आला आहे. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. मंगळवारी, २८ ऑक्टोबर रोजी पुन्हा केलेल्या स्कॅनमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली आणि श्रेयसची प्रकृती आता ठिक आहे.
टी-२० मालिका सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत सूर्यकुमारने अय्यरच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले आणि सांगितलं की तो बरा होत आहे. सूर्या म्हणाला की अय्यर टीममेट्सच्या फोन कॉल्सना प्रतिसाद देत आहे आणि आता त्याची प्रकृती स्थिर आहे.
