Asia Cup 2025 IND vs OMAN Suryakumar Yadav Rohit Sharma: भारत आणि ओमान यांच्यात आशिया चषक गट टप्प्यातील अखेरच सामना खेळताना दिसणार आहे. भारतीय संघाने सुरूवातीचे दोन सामने जिंकत सुपर फोरमध्ये आधीच धडक मारली आहे. तर ओमानचा संघ सुरूवातीचे दोन सामने गमावल्याने स्पर्धेबाहेर झाला आहे. हा सामना अबूधाबीमध्ये खेळवला जात असून नाणेफेक झाली आहे. नाणेफेकीदरम्यान मात्र सूर्यकुमार यादवने रोहित शर्माची आठवण काढली. ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.

भारतीय संघाने ओमानविरूद्ध या सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तर प्रतिस्पर्धी संघ गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल. भारताने आशिया चषकातील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये गोलंदाजीने सामन्याला सुरूवात केली. त्यामुळे संघाच्या फलंदाजांचा सराव आणि त्यांना खेळण्याची संधी म्हणून फलंदाजीचा निर्णय घेण्यात आला.

सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्या म्हणाला, “आम्ही प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत आम्ही प्रथम फलंदाजी केलेली म्हणून हा निर्णय घेतला आणि जेणेकरून फलंदाजांनाही संधी मिळेल. सुपर फोर सामन्यांपूर्वी पुरेसा गेम-टाईम मिळणं खूप महत्त्वाचं आहे. पहिल्या दोन सामन्यांत जशी कामगिरी केली, तीच कायम ठेवायची आहे. विकेट फलंदाजीसाठी चांगली दिसतेय, आता सलामीवीर त्याचा अंदाज घेतील.”

सूर्यकुमार यादव संघ जाहीर करताना विसरला नाव अन् रोहित शर्माची काढली आठवण

सूर्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल आहे का विचारताच तो म्हणाला, “हो संघात दोन बदल आहेत. हर्षित खेळणार आहे आणि अजून एक बदल आहे. अरे देवा मी विसरलो. थांबा थांबा अजून एक जण आहे. अरे देवा मी विसरलो, मी पण रोहितसारखा झालोय” आणि हे म्हणताच तो हसायला लागला. याचबरोबर रवी शास्त्रीदेखील सूर्याची फिरकी घेताना दिसली. आपण रोहित शर्माला अनेकदा नाणेफेकीदरम्यान प्लेईंग इलेव्हनमधील खेळाडू विसरले आहेत. तर रोहित काही वेळेस नाणं विसरला आहे, याशिवाय तो नाणेफेक जिंकल्यावर काय निवडायचं हेसुद्धा विसरला आहे. त्यामुळे हिटमॅनची ‘विसरभोळा रोहित’ अशीदेखील ओळख आहे.

भारताला २१ सप्टेंबरपासून सुपर फोरचे सामने खेळायचे आहेत. भारतासह पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ सुपर फोरसाठी पात्र ठरले. भारतीय संघ २१ सप्टेंबरला रविवारी पाकिस्तानविरूद्ध सामना खेळणार आहे.