Asia Cup 2025 Suryakumar Yadav Statement on IND vs PAK Rivalry: भारताने आशिया चषकात दुसऱ्यांदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. सुपर फोर सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६ विकेट्सने सहज विजय मिळवला. पाकिस्तानने भारतासमोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. टीम इंडियाने हे लक्ष्य फक्त १८.५ षटकात गाठत ६ विकेट्स गमावून पूर्ण केलं. या सामन्यातील विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानबाबत एक असं वक्तव्य केलंय की पाकिस्तानचा संघ संतापून उठेल.

पाकिस्तानविरूद्ध सामन्यात भारताकडून अभिषेक शर्माने ७४ धावांची धमाकेदार खेळी केली. तर गिल आणि अभिषेकची १०० धावांची भागीदारी तर तिलक वर्माची ३० धावांची खेळी निर्णयाक ठरली. अभिषेक शर्मा या सामन्यात तो भारताच्या विजयाचा हिरो ठरला. भारताने सुपर फोर टप्प्याची सुरुवात विजयाने केली.

सूर्यकुमार यादव भारताच्या या विजयानंतर पत्रकार परिषदेत पोहोचला. तिथे त्याला भारत पाकिस्तान यांच्यातील रायव्हलरीबद्दल प्रश्न विचारला, यावर सूर्याने असं काही भन्नाट उत्तर दिलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फार पूर्वीपासून एकापेक्षा एक कमालीचे सामने होत आले आहेत. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गेल्या ७ सामन्यांमध्ये भारतानेच विजय मिळवले आहेत.

सूर्यकुमार यादवचं भारत-पाक रायव्हलरीबाबत मोठं वक्तव्य

सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेत म्हणाला, “खरंतर मला या प्रश्नावर एक सांगायचं आहे की, तुम्ही या ‘रायव्हलरी’बाबत प्रश्न विचारणं बंद केलं पाहिजे. कारण, जर दोन संघ १५-२० सामने खेळलेत आणि स्कोअरलाइन ७-७ किंवा ८-७ अशी असेल, तर त्याला रायव्हलरी म्हणता येईल. पण जर स्कोअरलाइन १०-१ किंवा १३-० अशी असेल, मला नक्की आकडा माहित नाही हा… तर मग ती रायव्हलरीच उरत नाही.” सूर्याचा हा पत्रकार परिषदेतील व्हीडिओ व्हायरल होत आहे. सूर्याने हसत हसत पण चोख उत्तर पाकिस्तानला दिलं आहे, असं म्हणता येईल.

भारताने पाकिस्तानविरूद्ध विजय मिळवत सुपर फोर टप्प्याला चांगली सुरूवात केली आहे. पाकिस्तानवरील विजयासह भारतीय संघ टॉप-4 मधील गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. भारताचा नेट रन रेट हा ०.६८९ आहे. तर बांगलादेश श्रीलंकेवरील विजयासह दुसऱ्या स्थानी घसरला आहे. तर श्रीलंका आणि पाकिस्तान यांचं खातंही उघडलेलं नाही. सुपर फोरमध्ये चारही संघ एकमेकांशी भिडणार आहेत आणि यानंतर टॉप-२ मधील संघ थेट अंतिम सामन्यात खेळतील.