टी२० विश्वचषक २०२२ च्या तयारीत असलेल्या भारतीय संघाने पहिला सराव सामना जिंकला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा संघ १४५ धावा करू शकला आणि १३ धावांनी सामना गमावला. या सामन्यात भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ५२ धावा केल्या. त्याचवेळी हार्दिक पांड्याने २९ धावांची खेळी केली. त्याचवेळी अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमार यांनी चेंडूवर चमकदार कामगिरी केली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही आणि भारताचे सलामीवीर लवकर तंबूत परतले. यानंतर सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी करत संघाला सामन्यात परत आणले. त्याने ३५ चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. त्याचवेळी हार्दिक पांड्याने २० चेंडूत २९ धावा केल्या. या दोघांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे भारताने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १५८ धावा केल्या.

१५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाने पॉवरप्लेमध्ये २९ धावा करत चार विकेट गमावल्या. भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी घेत भारताला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाला सामन्यात पुनरागमन करता आले नाही आणि त्यांचे ठराविक अंतराने गडी बाद होत गेले. शेवटच्या काही षटकात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने नऊ विकेट गमावल्या होत्या आणि त्यांना विजयासाठी ३० धावांची गरज होती. हर्षलने शानदार गोलंदाजी करत भारताला १३ धावांनी विजय मिळवून दिला.

हेही वाचा : चेतेश्वर पुजारा लवकरच एका नवीन संघासोबत खेळणार, सोशल मीडियावर केली घोषणा  

या सराव सामन्यातून ऑस्ट्रेलियातील परिस्थितीशी जुळवून घेणे हे पर्थच्या मैदानावर भारतीय संघाचे उद्दिष्ट होते. पर्थमध्ये वेगवान गोलंदाजांना भरपूर उसळी आणि वेग मिळतो. अशा स्थितीत भारताचे फलंदाज आणि गोलंदाज त्याची सवय करून घेत आहेत आणि स्वत:ला त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शॉर्ट बॉल ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर एक आव्हान आहे आणि सर्व भारतीय फलंदाजांना त्यांचे पुल शॉट्समध्ये सुधारणा करावी लागेल. त्याचबरोबर गोलंदाजांना बाऊन्स आणि स्विंगनुसार त्यांची लाइन लेंथ अधिक अचूक करावी लागेल. या सामन्यापूर्वी विराट कोहलीने चाहत्यांना ऑटोग्राफ दिले.

हेही वाचा :   Women’s T20 Asia Cup: स्नेह राणाच्या फिरकीसमोर थायलंडचा संघ भुईसपाट, टीम इंडियाचा नऊ गडी राखून विजय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणखी एक सामना खेळणार आहे. हा सामना १३ ऑक्टोबरला पर्थ येथेच खेळणार आहे. त्यानंतर भारत १७ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि १९ ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध सराव सामने खेळणार आहे. हे दोन्ही सामने ब्रिसबेनच्या गाबा स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. भारताचा टी२० विश्वचषकात सुपर १२च्या दुसऱ्या गटात समावेश आहे. त्यामुळे सराव सामने संपल्यावर भारत २३ ऑक्टोबरला पाकिस्तानशी भिडणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न येथे होणार आहे.