छत्रसाल स्टेडियमवरील मारहाण आणि कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येत ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशील कुमारसह हरयाणामधील चार गुंडांचा समावेश होता. दिल्ली न्यायालयाने या चौघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

माजी कनिष्ठ राष्ट्रीय विजेत्या सागरला सुशील आणि त्याच्या साथीदारांनी सुमारे २५ मिनिटे मारहाण केली. पोलीस नियंत्रण कक्षात माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा ही मारहाण थांबवण्यात आली. हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे भूपेंद्र, मोहित आसोडा, गुलाब आणि मनजीत अशी आहेत, अशी माहिती रोहिणी जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त प्रणव तयाल यांनी दिली. मालमत्तेवरील अतिक्रमण आणि ताबा सोडण्यासाठीची धमकी याचे पर्यवसान ४ मे रोजी मारहाणीत घडले आणि त्यात सागरची हत्या झाली, असे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

रोहिणी येथील न्यायालयाचे महानगर दंडाधिकारी रिचा शर्मा यांनी पोलीस चौकशीसाठी २६ मे रोजी या चौघांना ताब्यात घेतले असून, ३० मे रोजी त्यांना पुन्हा न्यायालयात सादर केले जाईल. सुशीलच्या निर्देशानुसार हे चार गुंड छत्रसाल स्टेडियमवर दाखल झाले होते. यापैकी भूपेंद्रला २०११च्या दुहेरी हत्याकांडात अटक झाली होती, मोहित हा नवीन बाली या गुंडाचा प्रमुख हस्तक मानला जातो. नीरज बावनाला अटक झाल्यानंतर बाली हाच या टोळीचा म्होरक्या आहे. या चौघांविरोधातही अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते.

‘‘५ मे रोजी मध्यरात्री १२ वाजता सुशील आणि त्याचे साथीदारा स्कॉर्पिओ आणि ब्रीझा या दोन गाडय़ांमधून छत्रसाल स्टेडियमवर दाखल झाले. या सर्वाचा गुन्ह्यत सक्रिय सहभाग असून, त्यांनी घटनेची संपूर्ण माहिती उघड केली. पोलिसांच्या आगमनाची चाहूल लागल्यावरही ते घटनास्थळावरून पसार होण्यात अपयशी ठरले. त्यामुळे वाहने आणि शस्त्रे पोलिसांना घटनास्थळी सापडली,’’ असे तयाल यांनी सांगितले. चार गुंड जेव्हा छत्रसाल स्टेडियमवर पोहोचले, तेव्हा सुशील आपल्या १२ साथीदारांसह रवींदर आणि अमित यांना मारहाण करीत होता, असे निष्पन्न झाल्याचे तयाल यांनी सांगितले.

माध्यम निवाडय़ासंदर्भात आज सुनावणी

छत्रसाल स्टेडियममधील मारहाण आणि सागर धनखड हत्येप्रकरणी कुस्तीपटू सुशील कुमारच्या समावेशाबाबत जे सनसनाटी वृत्तांकन आणि माध्यम निवाडा केला जातो. याबाबतच्या याचिकेवर शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती डी. एन. पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंग यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीस येणार आहे.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.