एंटरटेन्मेंट.. एंटरटेन्मेंट.. और एंटरटेन्मेंट.. या शब्दांमध्ये ट्वेन्टी-२० क्रिकेटचे वर्णन करता येईल. कारण आजच्या पिढीला जास्त वेळ खर्च करायला परवडत नाही, त्यामुळे पारंपरिक कसोटी क्रिकेट मागे पडताना दिसत असून ट्वेन्टी-२० क्रिकेट आता स्वत:च्या पायावर उभे राहून चालायलाही शिकले आहे. फारच कमी वयात या क्रिकेटची मोहिनी लोकांवर पडली असून ते यामध्ये मश्गूल होताना दिसतात. यंदाच्या वर्षांत आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामने जास्त झाले नाहीत, पण आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगचे सामने मात्र चांगलेच रंगले. मुंबई इंडियन्सने कमाल करत या वर्षी आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगचेही जेतेपद पटकावले, तर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या दोन दिग्गजांनी या स्पर्धामधून निवृत्ती जाहीर केली. या वर्षी क्रिकेटला काळिमा फासणारा ‘स्पॉट-फिक्सिंग’चा प्रकार आयपीएलमध्ये घडला आणि त्याचे पडसाद बीसीसीआयवर उमटले. पण अध्यक्ष श्रीनिवासन यांनी आपला हेका कायम ठेवत अध्यक्षपदावरून पायउतार होण्यास नकार दिला. या वेळी पडद्यावर आणि पडद्यामागे बरेच नाटय़ घडले. दोषी खेळाडूंवर बीसीसीआयने कडक कारवाई केली असली तरी यापुढे या प्रकारांना आळा घालण्यासाठी बीसीसीआय नेमके काय करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
ट्वेन्टी-२० क्रिकेटला सुरुवातीला सापत्न वागणूक देणारे देश आता त्याचा उदोउदो करताना दिसत आहेत, यामध्ये भारताचाही समावेश आहेच. या क्रिकेटची वाढती लोकप्रियता पाहून प्रत्येक दौऱ्यामध्ये कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटबरोबरच ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेचाही समावेश करण्यात यावा, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची दाट शक्यता असून त्यानंतर मनोरंजनाचा हा धमाका अधिक फोफावणार आहे.
पाकिस्तानची छाप
या वर्षी सर्वात जास्त १२ सामने पाकिस्तानचा संघ खेळला, ज्यामध्ये त्यांनी ८ सामने जिंकले आणि चार सामने गमावले. तर विश्वास बसणार नाही असे सर्वात कमी सामने भारतीय संघ खेळला. भारताने या वर्षांत फक्त ऑस्ट्रेलियाबरोबर एकमेव ट्वेन्टी-२० सामना खेळला आणि तो जिंकलाही.
मुंबै मेरी जान!
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने या वेळी कमालच केली. आयपीएलपाठोपाठ चॅम्पियन्स लीग असा दुहेरी जेतेपदाचा मुकुट त्याने संघाला मिळवून दिला आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला विजयाच्या आनंदानिशी अलविदा करता आले. रोहितने ड्वेन स्मिथ, आदित्य तरे, दिनेश कार्तिक, अंबाती रायुडू, किरॉन पोलार्ड, मिचेल जॉन्सन आणि हरभजन सिंग या खेळाडूंची अप्रतिमपणे मोट बांधली आणि त्यामुळेच त्यांना दोन्ही जेतेपदे पटकावता आली. आयपीएलच्या साखळी सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करत मुंबईने बाद फेरी गाठली. उपांत्य फेरीत मुंबईने राजस्थान रॉयल्स आणि अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जचा फडशा पाडत जेतेपदाला गवसणी घातली. चॅम्पियन्स लीगमध्येही कामगिरीत सातत्य दाखवत मुंबईने अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सला पराभूत करत जेतेपद पटकावले.
सचिन, द्रविडची निवृत्ती
आयपीएल-चॅम्पियन्स लीग स्पर्धामधून मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ‘द वॉल’ राहुल द्रविड यांची निवृत्ती चटका लावून गेली. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला अवीट ठसा उमटवणाऱ्या या दोन्ही खेळाडूंनी या ट्वेन्टी-२० स्पर्धामध्ये दमदार कामगिरी केली. सचिनने हे वर्ष वगळता मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळले, पण त्याला एकदाही संघाला जेतेपद मिळवून देता आले नाही, असेच काहीसे द्रविडच्या बाबतीतही घडले. शेन वॉर्नच्या निवृत्तीनंतर राजस्थानची धुरा कोण सांभाळणार, हा प्रश्न होता. पण द्रविडने युवा खेळाडूंची उत्कृष्टपणे संघबांधणी केली, पण द्रविडला एकदाही जेतेपद पटकावता आले नाही. सचिनने मात्र न खेळता आयपीएल व चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या जेतेपदाची चव चाखली आणि निवृत्ती पत्करली.
 ‘स्पॉट-फिक्सिंग’ने काळिमा
पैशाची हाव माणसाला कधीही स्वस्थ बसू देत नाही आणि त्यामधून अनधिकृत, काळिमा फासणारी कृत्ये घडतात. याचे एक उदाहरण म्हणजे आयपीएलमधील ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरण. राजस्थान रॉयल्सच्या एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना ‘स्पॉट-फिक्सिंग’प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली आणि न्यायालयाने त्यांना कोठडीही सुनावली, पण कालांतराने त्यांना जामीन मिळाला. परंतु या श्रीशांत आणि चव्हाण यांच्यावर बीसीसीआयने आजीवन बंदीची कारवाई केली आहे. या तिघांसह काही सट्टेबाजांना, अभिनेता विंदू दारा सिंग आणि बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा जावई गुरुनाथ मयप्पन यांनाही पोलिसांनी अटक केली. या साऱ्यावरून ही विषवल्ली कुठपर्यंत पोहोचली आहे, याचा अंदाज येऊ शकतो.
हेकेखोर श्रीनिवासन
आपला जावई मयप्पन आणि संघ आयपीएलमधील कृष्णकृत्यात अडकलेले असले तरी हेकेखोर एन. श्रीनिवासन यांनी नियमांवर बोट ठेवत बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही. त्याऐवजी त्यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत जगमोहन दालमिया यांना हंगामी अध्यक्षपद दिले आणि सर्व स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा अध्यक्षाच्या खुर्चीवर जाऊन पुन्हा विराजमान झाले. नव्याने झालेल्या निवडणुकीत बिनविरोध निवडून येत त्यांनी आपल्या बीसीसीआयमधील साम्राज्याला धक्का लागू दिला नाही.
बीसीसीआय पुढे काय करणार?
‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरण दिल्ली पोलीस बाहेर काढतात, तर बीसीसीआयचे लाचलुचपत प्रतिबंधविरोधी पथक नेमके काय करते, हा सर्वात मोठा सवाल आहे. बीसीसीआयने दोषी खेळाडूंवर आजीवन बंदी घालत कडक शिक्षा केली, पण हे प्रकार रोखण्यासाठी बीसीसीआय कोणती पावले उचलणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष असेल.

या वर्षांतील आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामने
देश        सामने    विजय    पराभव    निकाल नाही
पाकिस्तान    १२    ८    ४    ०
श्रीलंका    ९    ६    ३    ०
द. आफ्रिका    ८    ५    ३    ०
इंग्लंड        ७    ३    ३    १
न्यूझीलंड    ७    ३    ३    १
ऑस्ट्रेलिया    ६    १    ५    ०
वेस्ट इंडिज    ५    ३    २    ०
भारत        १    १    ०    ०

Story img Loader