टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागल्याने न्यूझीलंडविरुद्धचा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यावर भारत आणि न्यूझीलंड संघाचं उपांत्य फेरीची गणितं ठरणार आहेत. त्यामुळे हा सामना जिंकण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असणार आहे. पाकिस्तानने सलग तीन सामने जिंकत उपांत्य फेरीत स्थान जवळपास निश्चित केलं आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कर्णधार विराट कोहली नाणेफेकीचा कौल हरला होता. पाकिस्ताननं या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ पाच गोलंदाजांसह मैदानात उतरला होता. भुवनेश्वर कुमारची गोलंदाजी फ्लॉफ ठरल्याने दुसरा पर्याय उरला नव्हता. त्यामुळे आता न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक महत्वाची ठरणार आहे. नाणेफेक झाल्यानंतर विराट आपल्या संघात बदल करण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा गोलंदाजी आल्यास विराट कोहली तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरू शकतो. तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करावी लागल्यास दोनपेक्षा जास्त फिरकीपटू संघात खेळवणं कठीण आहे.
नाणेफेकीचा कौल जिंकल्यास…
- जर विराट कोहली नाणेफेकीचा कौल जिंकल्यास पहिल्यांदा गोलंदाजी घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघात तीन फिरकीपटूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. भुवनेश्वर कुमार फॉर्मात नसल्याने त्याऐवजी संघात राहुल चाहरला संधी मिळण्याची शक्यता आहे. न्यूझीलंड संघात कर्णधार विलियमसन व्यतिरिक्त इतर फलंदाज फिरकीपटूंचा सामना तितक्या ताकदीने करत नाहीत. त्यामुळे राहुल चाहरला संधी मिळण्याची शक्यता आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचे सुरुवातीचे दोन विकेट फिरकीपटूंनी काढले होते. तर विलियमसन धावचीत झाला होता.
- विजयी धावांचा पाठलाग करताना भारताला एका चांगल्या फिनिशरची गरज आहे. अशात हार्दिकला संघात स्थान देणं गरजेचं आहे. पहिल्यांदा गोलंदाजी करताना भारत तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उरण्याची शक्यता आहे. गरज पडल्यास विराट पार्ट टाइम गोलंदाजी करू शकतो.
भारताने नाणेफेकीचा कौल हरल्यास…
- न्यूझीलंडचा कर्णधार विलियमसन नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात भारताला गोलंदाजी करावी लागेल. मैदानात पडत असलेल्या दवबिंदूमुळे फिरकीपटूंना गोलंदाजी करण्यात अडचणींचा सामना करावा लागतो. अशात विराट कोहली संघात जडेजा आणि चक्रवर्तीला स्थान देईल आणि हार्दिकच्या जागेवर शार्दुलला संधी देईल. त्यामुळे भारताकडे सहावा पर्याय उपलब्ध होईल.
- भारताची पहिली फलंदाजी असल्यास धीम्या खेळपट्टीवर मोठे फटके मारण्याऐवजी धावून धावसंख्या वाढवण्यावर जोर द्यावा लागेल. टीम इंडियाला कमीत कमी निर्धाव चेंडू खेळावे लागतील. तसेच गॅपमध्ये खेळत षटकाराऐवजी चौकारावर लक्ष्य केंद्रीत करावं लागेल. कोहली, रोहित आणि सूर्यकुमारसारख्या खेळाडूंची अशीच शैली आहे. तर हार्दिक आणि किशनसारख्या मोठे फटके मारणाऱ्या खेळाडूंना संघाबाहेर करण्याची शक्यता आहे.
- पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिली सहा षटकं महत्त्वाची असतात. कारण चेंडू जुना झाल्यानंतर मोठे फटके मारणं कठीण होतं. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये कोणता फलंदाज आक्रमकपणे खेळेल हे यासाठी रणनिती आखावी लागेल. राहुलला वेगाने धावा करण्याची जबाबदारी दिली जाईल. कारण रोहित आणि विराट नंतर तग धरून खेळू शकतात.