T20 WC : ‘लॉर्ड ठाकूर’ खेळणार न्यूझीलंडविरुद्धचा सामना? विराट म्हणतो, ‘‘शार्दुल आमच्या…”

शार्दुल प्लेईंग इलेव्हनमध्ये आल्यास हार्दिक पंड्या किंवा ‘हा’ खेळाडू होणार संघाबाहेर!

T20 WC virat kohli hints changes in team says shardul thakur included in our plans
शार्दुल ठाकूरबाबत विराटची प्रतिक्रिया

टी-२० विश्वचषकाच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीने मोठे संकेत दिले आहेत. टीम इंडियाला रविवारी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडशी भिडायचे आहे. अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्याच्या प्रश्नावर विराट म्हणाला, ”तो नेहमीच आमच्या योजनांमध्ये सहभागी असतो. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे.” पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानकडून पराभव झाला होता. न्यूझीलंड संघानेही पाकिस्तानविरुद्धची लढत गमावली आहे.

सामन्याच्या एक दिवस आधी मीडियाशी बोलताना विराट कोहली म्हणाला, ”शार्दुल ठाकूर हा हुशार खेळाडू आहे आणि त्याने अनेक प्रसंगी स्वत:ला सिद्धही केले आहे. पण तो संघात कुठे बसतो, हे पाहणे बाकी आहे.” अनेक क्रिकेटतज्ज्ञ हार्दिक पांड्याच्या जागी शार्दुलला संधी देण्याच्या बाजूने आहेत, तर काही लोक वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या जागी. भुवनेश्वरही चांगल्या फॉर्ममध्ये नाही.

हेही वाचा – T20 WC : मैत्री जीवाभावाची..! पाकिस्तानच्या विजयानंतर शोएब मलिकनं आफ्रिदीला ठोकला सलाम; पाहा VIDEO

पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानने १० विकेट्सने पराभव केला होता. भुवनेश्वर कुमारला संघातून वगळण्याच्या प्रश्नावर विराट कोहली म्हणाला, ”मला कुणालाही वगळण्याची इच्छा नाही. या खेळाडूंनी आमच्यासाठी दीर्घकाळ चांगली कामगिरी केली आहे. मागच्या सामन्यात आम्ही खराब खेळलो आणि हरलो हे तुम्हाला मान्य करावे लागेल. यासाठी कोणतेही कारण दिले जाऊ शकत नाही.”

टीम इंडियाने २००७ पासून टी-२० विश्वचषक जिंकलेला नाही. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा शेवटचा टी-२० विश्वचषक आहे. या स्पर्धेनंतर तो टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. अशा स्थितीत ते या स्पर्धेत आपली पूर्ण ताकद पणाला लावतील. त्याचबरोबर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला या स्पर्धेसाठी संघाचा मार्गदर्शक बनवण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 wc virat kohli hints changes in team says shardul thakur included in our plans adn

Next Story
विश्वचषक.. पाकिस्तान आणि विराट