टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. विशेष म्हणजे भारताने विजयासाठी दिलेलं १५२ धावांचं आव्हान पाकिस्ताननं १० गडी राखून पूर्ण केलं आहे. या विजयासह पाकिस्ताननं टी २० विश्वचषकात भारताविरूद्ध पहिल्या विजयाची नोंद केली आहे. पाकिस्तानच्या विजयानंतर दिल्लीसह काही भारतीय भागात फटाके वाजवले गेले. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटरवर सेहवागने याबाबत आपलं परखड मत व्यक्त केलं आहे.

“दिवाळीदरम्यान फटाक्यांवर बंदी आहेत. मात्र भारतातील काही भागांत पाकिस्तानच्या विजयानंतर फटाके फोडण्यात आले. हो… ते विजयाचा आनंद साजरा करत असतील! पण मग दिवाळीत फटाके उडवल्याने काय नुकसान होतं? असलं ढोंग कशाला? हे सगळं ज्ञान तेव्हाच (सणांच्या वेळेस) बरं आठवतं”, असं ट्वीट वीरेंद्र सेहवागने केलं आहे.

वीरेंद्र सेहवागने या ट्वीटपूर्वी पाकिस्तानला विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच पाकिस्तान चांगलं क्रिकेट खेळल्याचं ट्वीट केलं होतं.

माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर यांनीही फटाक्यांवरून खडे बोल सुनावले आहेत. गौतम गंभीरने शेमफुल हॅशटॅगसह “पाकिस्तानच्या विजयावर फटाके फोडून आनंद साजरा करणारे भारतीय होऊ शकत नाही”, असं ट्वीट केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात होते. मात्र, कोहलीच्या संघाला अपेक्षित खेळ करण्यात अपयश आले. १५२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १७.५ षटकांत गाठत टी-२० विश्वचषकात भारतावर सहा प्रयत्नांत पहिल्या विजयाची नोंद केली. रिझवानने ५५ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७९ धावांची, तर आझमने ५२ चेंडूत सहा चौकार, दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी साकारली. रिझवान आणि आझम या भरवशाच्या सलामीवीरांनी या वर्षांतील चौथी शतकी भागीदारी रचली. हा एक विक्रम ठरला. २०२१ या वर्षामध्ये जगातील कोणत्याच संघाच्या दोन फलंदाजांना हा पराक्रम करता आलेला नाही. विराटनेही सामना संपल्यानंतर या दोघांचं अभिनंदन केल्याचं पहायला मिळालं.