T20 WC ENG vs AUS : इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर सहज विजय; जोस बलटरनं धु-धु-धूतलं!

दुबईच्या मैदानावर इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला ८ गडी आणि ५० चेंडू राखून हरवलं.

T20 world Cup 2021 england vs australia match report
इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात

टी-२० विश्वचषक २०२१ च्या सुपर-१२ फेरीत विश्वविजेत्या इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला ८ गडी राखून मात देत उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेल्या इंग्लंडने जबरदस्त मारा करत ऑस्ट्रेलियाला १२५ धावांत गुंडाळले. ऑस्ट्रेलियाचा कप्तान अ‍ॅरॉन फिंचच्या ४४ धावांव्यतिरिक्त इतर फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. इंग्लंडकडून जलदगती गोलंदाज ख्रिस जॉर्डन, टायमल मिल्स आणि ख्रिस वोक्स यांनी तिखट मारा केला. प्रत्युत्तरात इंग्लंडचा सलामीवीर जोस बटलरने ३२ चेंडूत नाबाद ७१ धावा करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची पिसे काढली. जॉर्डन सामनावीर ठरला. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट घसरला आहे. त्यामुळे ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ ग्रुप ए मध्ये दुसऱ्या स्थानी आहे.

इंग्लंडचा डाव

ऑस्ट्रेलियाच्या छोटेखानी आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी ६६ धावांची भागीदारी केली. फिरकीपटू अॅडम झम्पाने रॉयला पायचीत पकडले. त्याने २२ धावा केल्या. रॉयनंतर डेव्हि़ड मलानही स्वस्तात बाद झाला. दुसऱ्या बाजूने बटलरने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. त्याने बेअरस्टोसोबत १२व्या षटकातच विजयावर शिक्कामोर्तब केले. बटलरने ३२ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारासह नाबाद ७१ तर बेअरस्टोने २ षटकारासह नाबाद १६ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाचा डाव

मागील सामन्यात अर्धशतक ठोकलेला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (१) दुसऱ्याच षटकात तंबूत परतला. ख्रिस वोक्सने त्याला बाद केले. त्यानंतर आलेले स्टीव्ह स्मिथ (१), ग्लेन मॅक्सवेल (६), मार्कस स्टॉइनिस (०) स्वस्तात बाद केले. पहिल्या ६ षटकात ऑस्ट्रेलियाला २१ धावा करता आल्या. त्यानंतर मॅथ्यू वेड (१८) आणि अगरने (२०) झुंज दाखवली. मैदानावर ठाण मांडून बसलेला फिंच १९व्या षटकात बाद झाला. त्याने ४ चौकारांसह ४४ धावा केल्या. इंग्लंडकडून जलदगती गोलंदाज ख्रिस जॉर्डनने १७ धावांत ३ बळी घेतले. वोक्स आणि टायमल मिल्सला प्रत्येकी २ बळी घेता आले.

हेही वाचा – टी-२० वर्ल्डकपदरम्यान ‘राउडी’ फिरकीपटूचं निधन; भारत-पाकिस्तानला केलं होतं हैराण!

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

इंग्लंड – इऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, टायमल मिल्स.

ऑस्ट्रेलिया – अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, एश्टन अगर, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झम्पा, जोश हेझलवूड.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup 2021 england vs australia match report adn

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना