टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यास फक्त काही दिवस शिल्लक आहेत. पण, त्याआधी, भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक प्रकारचे युद्ध सुरू झाले आहे. पाकिस्तान संघाच्या टी-२० विश्वचषकाची नवीन जर्सी हे या वादाचे कारण आहे. वर्ल्डकप स्पर्धेला काही दिवस शिल्लक असताना पाकिस्तान संघाच्या जर्सीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि या फोटोंमुळे नवा वाद उद्भवला आहे.

सोशल मीडियावर समोर आलेल्या या जर्सीच्या फोटोंमध्ये भारताऐवजी यूएईचे नाव स्पर्धेच्या लोगोवर लिहिले आहे. खरे तर भारत हा टी -२० विश्वचषकाचा यजमान देश आहे. करोनामुळे ही स्पर्धा भारतातून यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केली जात असली, तरी आयोजनाची जबाबदारी भारताच्या हातात आहे. आता यावर वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमांनुसार, आयसीसी बॅनरखाली होणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये, सर्व सहभागी संघांना त्यांच्या जर्सीच्या उजव्या बाजूला आणि स्पर्धेचे नाव आणि यजमान देशाचे नाव लिहिणे गरजेचे आहे. पण गुरुवारी व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये पाकिस्तानची जर्सी पूर्णपणे वेगळी होती.

हेही वाचा – T20 World Cup : “भारताला हरवा आणि मिळवा…”, रमीझ राजांची पाकिस्तानी खेळाडूंना ‘बंपर’ ऑफर!

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम टी-२० विश्वचषकासाठी संघाची नवी जर्सी परिधान करताना दिसत आहे. या जर्सीमध्ये स्पर्धेचे यजमान म्हणून भारताच्या जागी यूएईचे नाव लिहिले गेले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील कटू संबंध इतरांपासून लपलेले नाहीत. अशा परिस्थितीत जर या जर्सीमध्ये थोडेसे सत्य असेल तर पीसीबीच्या या हालचालीमुळे दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांमधील तणाव वाढू शकतो. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान २४ ऑक्टोबरला आमनेसामने असतील.