भारत आणि इंग्लंडदरम्यान खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेचा महत्त्वाचा भाग बनलेला चाहता जार्वो पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतण्यास सज्ज झाला आहे. सध्या सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारत उद्या न्यूझीलंडशी भिडणार आहे. या सामन्याच्या दोन दिवस आधी जार्वोने एक ट्वीट केले आहे.

भारत-इंग्लंडमधील कसोटी मालिकेत जार्वो सर्वांच्या परिचयाचा झाला होता. मैदानातील घुसखोरीमुळे तो सोशल मीडियावर ट्रेंडही होत होता. ओव्हल मैदानावरील सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना जार्वोने मैदानात प्रवेश केला. वेगवान गोलंदाज उमेश यादव ३४व्या षटकाचा तिसरा चेंडू टाकत होता, तत्पूर्वी जार्वो गोलंदाजीसाठी मैदानात धावत आला. यावेळी तो इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोला जाऊन धडकला. सुरक्षारक्षकांनी त्याला पळत जाऊन बाहेर काढले होते.

लॉर्ड्स कसोटीत रोहित शर्मा बाद झाला तेव्हा तो पॅड आणि हेल्मेट घालून मैदानात दाखल झाला. यादरम्यान एका चाहत्याने त्याच्यासाठी मैदानात बॅटही फेकली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला मैदानाबाहेर नेले. यानंतर, जेव्हा भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत होता, तो पुन्हा एकदा मैदानात पोहोचला. त्यावेळी तो भारतीय संघासाठी क्षेत्ररक्षक उभारल्यासारखी प्रतिक्रिया देत होता. त्याला पाहून मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांना हसू आवरता आले नव्हते.

हेही वाचा – VIDEO : पाकिस्तानच्या आसिफ अलीनं दिवाळीपूर्वीच फोडले फटाके..! २ षटकात २४ धावांची गरज असताना…

आता टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत जार्वोने आपल्या प्रवेशाचे संकेत दिले आहे. भारताच्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याने एक ट्वीट केले. ”टी-२० विश्वचषकासाठी भारताला माझी गरज आहे का? माझे पूर्ण किट तयार आहे”, असे तो या ट्वीटमध्ये म्हणाला.

कोण आहे जार्वो?

जार्वो हा इंग्लिश नागरिक भारतीय संघाचा चाहता आहे. ब्रिटिश प्रँकस्टार आणि यूट्यूबर जार्वोचे पूर्ण नाव डॅनियल जार्विस आहे. जार्वोचा खरा हेतू केवळ त्याच्या कृत्यांमुळे माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणे, हा आहे. मात्र, त्याचा उर्मटपणा आता त्याला महागात पडला आहे. यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबने त्याला आजीवन लीड्स मैदानावर प्रवेश करण्यास बंदी घातली. तसेच दंडही आकारला.