सलामीवीर के. एल. राहुलने केलेल्या ५१ धावा आणि नंतर इशान किशनने केलेल्या ७० धावांच्या फटकेबाज सलामीच्या जोरावर भारताने सोमवारी झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या सराव सामन्यात इंग्लंडला सात गडी आणि सहा चेंडू राखून पराभूत केले. दुबई येथे झालेल्या या सराव सामन्यात इंग्लंडने दिलेले १८९ धावांचे लक्ष्य भारताने १९ षटकांत गाठले. या सामन्यामध्ये भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत नेहमीप्रमाणे त्याच्या खास शैलीमध्ये स्टम्प्समागे कॉमेन्ट्री करताना दिसून आला. विशेष म्हणजे तब्बल चार वर्षांनी टी २० मध्ये पुनरागमन करणाऱ्या रविचंद्रन अश्विनला पंत मजेदार सल्ला देतानाही स्टम्प माइकमध्ये रेकॉर्ड झालं आहे.

इंग्लंडच्या फलंदाजीच्या वेळेस १० षटकांची गोलंदाजी झाल्यानंतर ११ वं षटक अश्विनला देण्यात आलं. अश्विनने त्यापूर्वी त्याची दोन षटकं टाकली होती. १३ धावांच्या मोबदल्यात अश्विनला एकही विकेट तोपर्यंत मिळाली नव्हती. आपलं तिसरं षटक टाकण्यासाठी आलेल्या अश्विनला विकेट घेण्यासाठी प्रोत्साहन देताना पंत स्टम्प मागून मजेदारपद्धतीने त्याला सल्ले देताना दिसून आला. पंत अश्विनला लेग स्पिन चेंडू टाकण्याचा सल्ला देत होता. हीच योग्य वेळ असून लेग स्पिन टाकण्याची इच्छा पूर्ण करुन घे असं पंत सांगताना दिसला. “अरे लेग स्पिन डाल दो अश्विन भाई। यही मौका है यही दस्तूर है। लेग स्पिन डाल दो यार। अरमान पूरे करने का यही मौका है लेग स्पिन का,” असं पंत म्हणताना दिसला.

पंत एवढा जोर काढून सल्ला देत असतानाच अश्विनने मात्र त्याच्या या सल्ल्यावर काहीच प्रतिक्रिया दिल्याचं पहायला मिळालं.

भारताचा उपकर्णधार आणि प्रमुख सलामीवीर रोहित शर्माला या सामन्यासाठी विश्रांती दिल्याने राहुल आणि इशान यांना सलामीला खेळण्याची संधी मिळाली. राहुलने सुरुवातीपासून आक्रमक शैलीत फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांवर दडपण टाकले. त्याने अवघ्या २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, पुढच्याच चेंडूवर त्याला मार्क वूडने बाद केले. कर्णधार विराट कोहलीला (११) फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. पण इशानने आदिल रशिदच्या एकाच षटकात दोन षटकार मारत अर्धशतक झळकावले. त्याने पुढील दोन चेंडूंवर दोन चौकारही मारले. अखेर ७० धावांवर तो नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. अखेर ऋषभ पंत (नाबाद २९) आणि हार्दिक पंड्या (नाबाद १६) यांनी उर्वरित धावा करून भारताला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १८८ अशी धावसंख्या उभारली. जेसन रॉय (१७), जोस बटलर (१८) आणि डेविड मलान (१८) हे इंग्लंडचे अव्वल तीन फलंदाज झटपट बाद झाले. मात्र, जॉनी बेअरस्टो (४९) आणि लियाम लिविंगस्टन (३०) यांनी इंग्लंडला सावरले. तर अखेरच्या षटकांत मोईन अलीने अवघ्या २० चेंडूत नाबाद ४३ धावा केल्याने इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारली.