T20 WC PAK vs AFG : आसिफ-बाबरपुढे अफगाणिस्तान गपगार..! पाकिस्तानची विजयी हॅट्ट्रिक

दुबईच्या क्रिकेट मैदानावर पाकिस्तानने अफगाणिस्तानला ५ गड्यांनी मात दिली.

t20 world cup pakistan vs afghanistan match report
पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात

टी-२० विश्वचषक स्पर्धेत सुसाट असलेल्या पाकिस्तानने अफगाणिस्तानला ५ गड्यांनी मात देत विजयी हॅट्ट्रिक नोंदवली आहे. शेवटच्या २ षटकात २४ धावांची गरज असताना पाकिस्तानच्या आसिफ अलीने एका षटकात ४ षटकार ठोकून सामना जिंकवून दिला. दुबईच्या मैदानावर अफगाणिस्तानचा कप्तान मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या पडझडीनंतर कप्तान मोहम्मद नबी आणि गुलबदिन नैब यांनी केलेल्या नाबाद ७१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तानने २० षटकात ६ बाद १४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानी कप्तान बाबर आझमने अर्धशतक ठोकले, तर आसिफ अलीने ७ चेंडूत नाबाद २५ धावा केल्या. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. पाकिस्तानने या विजयासह उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे.

पाकिस्तानचा डाव

अफगाणिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने आपला सलामीवीर मोहम्मद रिझवानला स्वस्तात गमावले. त्यानंतर बाबरने फखर झमानसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. फखरला नबीने पायचीत पकडले. त्याने ३० धावा केल्या. स्टार फिरकीपटू राशिद खानने मोहम्मद हाफिज त्यानंतर बाबरला बाद करत पाकिस्तानच्या अडचणी वाढवल्या. बाबरने ४ चौकारांसह ५१ धावा केल्या. त्यानंतर आसिफ अलीने वादळी खेळी करत पाकिस्तानचा विजय सोपा केला. त्याने १९व्या षटकात करिम जनतला ४ षटकार ठोकले.

हेही वाचा – T20 WC : “न्यूझीलंडला हरवायचं असेल तर…”, गावसकरांचा ‘या’ दोघांना संघाबाहेर करण्याचा सल्ला!

अफगाणिस्तानचा डाव

पाकिस्तानचा डावखुरा फिरकीपटू इमाद वसीमने सलामीवीर हजरतुल्ला झझाईला शून्यावर तंबूत धाडत अफगाणिस्तानला पहिला धक्का दिला. त्यांचा दुसरा सलामीवीर मोहम्मद शहजाद शाहिन आफ्रिदीचा बळी ठरला. त्यानंतर अफगाणिस्तानने पॉवरप्लेमध्ये अजून दोन फलंदाजांना गमावले. शादाब खानने झादरानला यष्टीपाठी झेलबाद करत अफगाणिस्तानची अवस्था ६ बाद ७६ अशी केली. शंभरीच्या आतच अफगाण फलंदाज आटोपणार असे वाटत असताना कप्तान मोहम्मद नबी आणि गुलबदिन नैब उभे राहिले. या दोघांनी दबाव न घेता फटकेबाजी केली. शेवटच्या २ षटकात त्यांनी ३६ धावा कुटल्या. नबी ५ चौकारांसह ३५ तर नैब ४ चौकार आणि एका षटकारासह ३५ धावांवर नाबाद राहिला.

दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हारिस रौफ आणि शाहिन शाह आफ्रिदी.

अफगाणिस्तान – हजरतुल्ला झझाई, मोहम्मद शहजाद, रहमानउल्ला गुरबाज, नजीबुल्ला झादरन, मोहम्मद नबी (कर्णधार), असगर अफगाण, गुलबदिन नैब, करीम जनात, राशिद खान, मुजीब उर रहमान आणि नवीन-उल-हक.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup pakistan vs afghanistan match report adn

ताज्या बातम्या