ऑस्ट्रेलियातील टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी झालेला श्रीलंकेचा क्रिकेटर दनुष्का गुणतिलका याला अटक करण्यात आली आहे. शनिवारी श्रीलंकाने इंग्लंडिविरोधात आपला शेवटचा सामना खेळला होता. यानंतर लगेचच गुणतिलकाला अटक करण्यात आली. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बलात्काराच्या आरोपाखाली दनुष्का गुणतिलका याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, श्रीलंका संघ त्याच्याशिवाय मायदेशी रवाना झाला आहे.

डेटिंग अॅपच्या माध्यमातून भेट झालेल्या २९ वर्षीय तरुणीने गुणतिलकावर बलात्काराचा आरोप केला आहे. सिडनी येथे गेल्या आठवड्यात ही घटना घडली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

“सिडनीत गेल्या आठवड्यातील घटनेप्रकरणी रविवारी मध्यरात्री १ वाजता सुसेक्स स्ट्रीट हॉटेल येथून आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टारला अटक करण्यात आल्याचा वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. २९ वर्षीय तरुणीने आपल्या घरात बलात्कार झाल्याची तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी स्टेट क्राइम कमांड आणि पोलिसांनी संयुक्तपणे तपास केला होता,” असं वृत्त ऑस्ट्रेलियामधील माध्यमांनी दिलं आहे.

दरम्यान, अटकेच्या कारवाईनंतर श्रीलंका संघ त्याला मागे सोडून मायदेशी रवाना झाला आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी श्रीलंका संघासह ऑस्ट्रेलिया दाखल झालेला गुणतिलका जखमी झाल्याने संघाबाहेर गेला होता. अशीन बंडाराने संघात त्याची जागा घेतल्यानंतरही तो संघासह थांबला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुणतिलकाने १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये नुकतंच नामिबियाविरोधात खेळलेल्या टी-२० सामन्याचाही समावेश आहे. या सामन्यात संघाचा पराभव झाला होता. गुणतिलकावर २०१८ मध्येही असाच आरोप झाला होता. यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण तपासानंतर पोलिसांनी त्याची सुटका केली होती आणि त्याच्या मित्राला अटक केली होती.