ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारताऐवजी अमिरातीत -गांगुली

विश्वचषकाला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होईल, अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे.

नवी दिल्ली : करोना साथीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणारी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने सोमवारी जाहीर केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) काही आठवडय़ांपूर्वी झालेल्या बैठकीत ‘बीसीसीआय’ला विश्वचषकाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी २८ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे भारतातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विश्वचषक अमिरातीत खेळवणेच सर्वाच्या सोयीचे ठरेल, याची ‘बीसीसीआय’ला कल्पना होती. आता इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) उर्वरित हंगामदेखील अमिरातीत होणार आहे.

विश्वचषकाला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होईल, अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. मात्र गांगुलीने अद्याप याविषयी काहीही निर्णय घेण्यात आला नसल्याचे सांगितले.

‘‘आयसीसीशी आमचा संवाद सुरू असून लवकरच विश्वचषकाच्या अंतिम तारखा जाहीर करण्यात येतील. आयपीएल संपल्यानंतर विश्वचषकापूर्वी खेळाडूंसह आयोजकांना किमान एका आठवडय़ाचा अवधी मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’’ असे गांगुलीने नमूद केले.

भारताचे खेळाडू १५ सप्टेंबपर्यंत दुबईत

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर १५ सप्टेंबपर्यंत सर्व भारतीय खेळाडू दुबईत दाखल होतील, असे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले. ‘आयपीएल’च्या १४व्या हंगामातील उर्वरित ३१ सामने अमिरातीत होणार असून त्यानंतर आठवडय़ाभरात विश्वचषकाला प्रारंभ होईल, असे अपेक्षित आहे.

 

गेल्या काही महिन्यांपासून देशातील स्थितीचा आम्ही आढावा घेतला. मात्र करोनाचा धोका अद्यापही कायम असल्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषक अमिरातीत खेळवण्याचा अधिकृत निर्णय घेण्यात आला आहे. सर्वाच्या आरोग्याच्या सुरक्षेला प्राधान्य देत ही स्पर्धा भारताबाहेर खेळवण्याचे आम्ही ठरवले असले तरी स्पर्धेचे यजमानपद ‘बीसीसीआय’च भूषवणार आहे.

– सौरव गांगुली, ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup to be shifted from india to uae says sourav ganguly zws

ताज्या बातम्या