टी-२० क्रिकेटमध्ये तब्बल १४ वर्षांचा जेतेपदाचा वनवास संपवून विश्वचषकावर नाव कोरण्याचे भारतीय क्रिकेट संघाचे स्वप्न रविवारी उद्ध्वस्त झाले. न्यूझीलंडने ‘अव्वल-१२’ फेरीतील लढतीत अफगाणिस्तानला धूळ चारल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अखेरचा ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षणाखाली शेवटची स्पर्धा खेळणाऱ्या भारताकडून तमाम देशवासीयांना प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र तसे न झाल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला. वर्चस्वपूर्ण विजयासह न्यूझीलंडने अफगाणिस्तानलाही स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवताना दुसऱ्या गटातून पाकिस्तानसह उपांत्य फेरीतील स्थान सुनिश्चित केले. अन्य गटातून इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र या सामन्यादरम्यान क्रिकेट पाकिस्तानने भारतीय चाहत्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तरी या ट्रोलिंगच्या बाऊन्सरला भारताचा माजी क्रिकेपटू वसीम जाफरने थेट सीमापार टोलवल्याचं ट्विटरवर पहायला मिळालं.
झालं असं की अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केलं असतं तर भारताला उपांत्यफेरीमध्ये जाण्याची संधी होती. मात्र सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये अफगाणिस्तानला न्यूझीलंडला रोखता येणार नाही हे जवळजवळ स्पष्ट झालं.
त्यावरुनच पाकिस्तान क्रिकेट या अधिकृत ट्विटर हॅण्डलने दुपारी साडेचारच्या सुमारास, “तुम्हाला कसं वाटतंय भारतीय चाहत्यांनो?” असा प्रश्न विचारुन भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न केला. खरं तर स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न या ट्विटमधून करण्यात आला. मात्र या ट्विटर वसीम जाफरने अगदी भन्नाट उत्तर दिलं. “१२-१ ला मजबूत जेवलोय. पोट अजूनही भरल्यासारखं वाटतंय,” असं वसीम जाफरने हे ट्विट कोट करुन रिट्विट करत उत्तर दिलं.
या ट्विटचा अर्थ काय?
आता या ट्विटचा खरा अर्थ सांगायचा झाल्यास, भारत आणि पाकिस्तानदरम्यान विश्वचषकामध्ये आतापर्यंत म्हणजेच या विश्वचषकातील सामना पकडून एकूण १३ सामने झालेत त्यापैकी १२ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवलाय. तर पाकिस्तानने यंदा पहिल्यांदाच भारताला विश्वचषकात पराभूत करुन भारत विरुद्ध पाकिस्तान या लढतीची आकडेवारी १२ विरुद्ध १ विजय अशी केलीय. त्यावरुनच जाफरने खोचकपणे १२-१ असा उल्लेख आपल्या ट्विटमध्ये केलाय.
रविवारच्या सामन्यात काय घडलं?
ट्रेंट बोल्टच्या (३/१७) भेदक माऱ्यानंतर कर्णधार केन विल्यम्सन (नाबाद ४०) आणि डेवॉन कॉन्वे (नाबाद ३६) यांच्या उत्तम फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने रविवारी टी-२० विश्वचषकात अफगाणिस्तानवर आठ गडी आणि ११ चेंडू राखून मात केली. न्यूझीलंडने या विजयासह उपांत्य फेरी गाठली असून अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात आले. अबू धाबी येथे झालेल्या या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात अफगाणिस्तानने दिलेले १२५ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने १८.१ षटकांत गाठले. १२५ धावांचा पाठलाग करताना मार्टिन गप्टिल (२८) आणि डॅरेल मिचेल (१७) यांनी न्यूझीलंडच्या डावाची आक्रमक सुरुवात केल्यावर त्यांना अनुक्रमे रशीद खान आणि मुजीब उर रहमानने बाद केले. त्यामुळे नऊ षटकांत न्यूझीलंडची २ बाद ५७ अशी धावसंख्या होती. मात्र, विल्यम्सन आणि कॉन्वे यांनी दडपण न घेता संयमाने फलंदाजी केली. त्यांनी ६८ धावांची अभेद्य भागीदारी रचत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.