टी-२० विश्वचषक स्पर्धा सध्या रंगतदार वळणावर आहे. उपांत्यफेरीसाठी दोन्ही गटांमधून नेमके कोणते दोन संघ पात्र ठरणार यासंदर्भातील चुरस दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. भारत दुसऱ्या गटामध्ये असून ऑस्ट्रेलियासहीत न्यूझीलंडसारखे प्रबळ दावेदार समजले जाणार संघ हे पहिल्या गटामध्ये आहेत. सुपर १२ आधी खेळवण्यात आलेल्या सामन्यांमधून नेदरलॅण्डस्, आयर्लंडबरोबरच श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे संघ अव्वल १२ संघांच्या फेरीसाठी पात्र ठरले. या चारही संघांनी टी-२० मधील अव्वल आठ संघांना म्हणजेच आधीपासूनच पात्र ठरलेल्या संघांना झुंजवताना दिसत आहेत. ३१ ऑक्टोबरला पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आयर्लंड सामन्यामध्ये हीच झुंजार वृत्ती दिसून आली.
झालं असं की, ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनच्या मैदानावर आयर्लंडचा ४२ धावांनी पराभव करत सामना जिंकला. मात्र या सामन्यामध्ये आयर्लंडने दिलेली कडवी झुंज चर्चेचा विषय ठरली. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १७९ धावांचा डोंगर उभारला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघांचा फलंदाज मार्कस स्टॉनिस १५ व्या षटकामध्ये फलंदाजी करत होता. अदीर गोलंदाजी करत असलेल्या या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर स्टॉनिसने एक उत्तुंग फटका लगावला. चेंडू फार उंचावरुन सीमारेषेकडे जात असतानाच सीमारेषेजवळ बेरी मॅककार्थीने तुफान चपळता दाखवत हवेत झेप घेत चेंडू पकडला. मात्र आपण सीमारेषेच्या पलिकडे जात असल्याचं लक्षात येतात त्याचे चेंडू पुन्हा मैदानात फेकला.
मॅककार्थीने मागे झेपावत चेंडू हातात पकडला अन् नंतर तो पुन्हा मैदानात फेकताना तो जोरात सीमारेषेवरील दोरीवर आदळला. मात्र हे सारं करताना त्याने चेंडू हातात असताना आपल्या शरीराचा सीमारेषेला स्पर्श होणार नाही याचीही काळजी घेतली. मॅककार्थीने केलेली फिल्डींग पाहून समालोचकांबरोबरच मैदानातील प्रेक्षकांनाही त्याला दाद दिली. विशेष म्हणजे संभाव्य षटकार असणाऱ्या या फटक्यावर मॅककार्थीला केवळ दोन धावा घेता आल्या.
आयसीसीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओखालील कमेंट्समध्ये मॅककार्थीवर कौतुकाचा वर्षाव होत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.