खेळाडू म्हणून निवृत्ती स्वीकारल्यानंतर बहुतांशी जण प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसू लागतात. मूळच्या अकोल्याच्या आणि लग्नानंतर ठाणेकर झालेल्या शैलजा गोहाड यांची कहाणी सर्वस्वी वेगळी. वडिलांची स्वातंत्र्यसैनिक ही पाश्र्वभूमी आणि घरातही पुढारलेलं वातावरण. अमरावती विद्यापीठात गृहविज्ञान विषयात बीएस्सीपर्यंतचं शिक्षण झालेलं. स्पर्धात्मक पातळीवर टेबल टेनिसमध्ये सक्रिय सहभाग होता. मात्र पूर्णवेळ कारकीर्दीचा तो पर्याय नव्हता. लग्नानंतर ठाणे कर्मभूमी झालं. योगायोगाने सासरकडची मंडळी उच्चविद्याविभूषित आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत. सासूबाईंच्या आग्रहामुळे शैलजाताईंनी एमएस्सी करण्याचा निर्णय घेतला. ‘टेक्स्टाइल डिझायन’ या वेगळ्या वाटेवरच्या विषयात पदव्युत्तर शिक्षण झालं. मुंबईतल्या एका नामांकित महाविद्यालयात अध्यापकपदाच्या जबाबदारीनं शिक्षणाला साजेसं काम मिळालं. पीएचडीसाठी अभ्यास सुरू झाला. खेळापासून दूर क्षेत्रात उत्तम कारकीर्द घडत असतानाच शैलजाताईंना १९९०च्या सुमारास ठाण्यात आयोजित राष्ट्रीय पातळीची स्पर्धा पाहण्याचा योग आला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या एकाही खेळाडूला पदक मिळालं नाही. खेळाडूंची कामगिरीही सर्वसाधारण होती. या परिस्थितीने शैलजाताईंना एक विचारांकुर मिळाला. नैपुण्य असूनही आपले खेळाडू मागे का? या विचारातून त्यांनी रीतसर प्रशिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्वदीचा कालखंड म्हणजे क्रिकेटज्वर टोकाला आणि क्रिकेटेतर खेळ नगण्य अवस्थेत अशी परिस्थिती होती. त्या काळात टेबल टेनिस अकादमी असा विचारही करणं धाडसाचं होतं. वर्षभर नोकरी आणि प्रशिक्षण अशी दुहेरी जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही जबाबदाऱ्यांना न्याय देता येत नसल्यानं चांगल्या पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. शिक्षकी पेशा सोडून हे कसलं खूळ, अशी टीका झाली. मात्र त्या ठाम राहिल्या. अकादमीसाठी स्वत:ची अशी जागा नव्हती, सोबतीला मनुष्यबळ नव्हतं, की प्रशिक्षणाचा शास्त्रोक्त अनुभव गाठीशी नव्हता. तरीही १९९५ साली बूस्टर अकादमी सुरू झाली. २२ वर्षांनंतर बूस्टर अकादमी ठाण्यातच नव्या प्रशस्त जागेत स्थलांतरित झाली आहे. गेल्या रविवारी अकादमीच्या नव्या वास्तूचे अनावरण राष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाचे सचिव धनराज चौधरी यांच्या हस्ते झालं. यानिमित्ताने टेबल टेनिस क्षेत्रातील मान्यवर आणि अकादमीच्या जुन्या-नव्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावाच रंगला होता.

‘‘एम.एच. हायस्कूलमध्ये ३ टेबलं आणि १० खेळाडूंसह प्रशिक्षणाला सुरुवात केली. त्यानंतर भगवती विद्यालयात स्थलांतरित झालो. तेव्हा टेबलं कमी होती आणि कमरेइतकी भिंत होती. विटांमधून पाणी आत यायचं. त्या वेळी मुलांना अनवाणी खेळण्याचा सल्ला दिला होता. स्वानंद एज्युकेशन सोसायटीच्या टिळक सरांनी व्यावहारिक विचार न करता खेळासाठी जागा उपलब्ध करून दिली. नवीन जागेत स्थलांतरित होण्यापूर्वी अकादमी भगवती विद्यालय आणि हितवर्धिनी सभा येथे सुरू होती. आता तीनहात नाका परिसरात संपूर्ण वातानुकूलित २००० चौरस फूट जागेत अकादमी उभी राहत आहे. जागा पूर्णवेळ ताब्यात असल्याने सार्वजनिक कोर्ट म्हणूनही वेळ राखून ठेवता येईल,’’ असं शैलजाताईंनी सांगितलं.

सुरुवातीला शैलजाताईंचा ‘एकला चलो रे’ प्रवास सुरू झाला. मात्र प्रवासात समविचारी मंडळींची साथ मिळाली. केवळ खेळाचं प्रशिक्षण पुरेसं नाही. मानसिक कणखरतेत मुलं मागे पडतात हे लक्षात आल्यावर डॉ. नितीन पाटणकर अकादमीशी जोडले गेले. मानसिक कणखरता आणि आहार नियोजन या संदर्भात ते खेळाडूंना मार्गदर्शन करतात. सुनंदा जोशी फिजिओथेरपी आणि योगाचं प्रशिक्षण देतात, तर डॉ. प्रांजली जोशी तंदुरुस्तीची जबाबदारी सांभाळतात. स्पर्धाच्या निमित्ताने शैलजाताई बाहेर असतात, तेव्हा दिनकर पळणीटकर (काका) आणि चित्रा कुलकर्णी प्रशिक्षणाचं काम पाहतात.

‘‘शास्त्र शाखेची पाश्र्वभूमी असल्याने प्रशिक्षणातही त्याचे पालन करण्याचा प्रयत्न केला. वक्तशीरपणा आणि शिस्त या दोन गोष्टींचे महत्त्व विद्यार्थ्यांवर बिंबवले. खेळाडू म्हणून घडत असतानाच चांगला माणूसही घडेल, यावर भर दिला. प्रशिक्षक म्हणून मी कडक आहे; पण खेळाडूला मोकळेपणाने बोलता यायला हवं. त्यांच्यासाठी मी मित्रमैत्रिणीप्रमाणे असेन, याकडे लक्ष दिलं. म्हणूनच अकादमी अनेक खेळाडूंसाठी दुसरं घर आहे. आजही बहुतांशी पालक हौसेसाठी मुलांना टेबल टेनिस प्रशिक्षणाला पाठवतात. शंभर मुलांमधून एखादा व्यावसायिक खेळाडू घडतो. हे प्रमाण उत्साहवर्धक नाही. मात्र ते जाणूनच काम करत राहिले,’’ असं शैलजाताईंनी सांगितलं.

‘‘पती, मुलगा आणि एकत्र कुटुंबातील सर्वाची पुरेपूर साथ असल्यानेच हा डोलारा सांभाळू शकले. पालकांनी मनापासून सहकार्य केल्याने वाटचाल यशस्वी झाली आहे,’’ असं त्यांनी आवर्जून सांगितलं. प्रशिक्षकांना तयार करण्यासाठी स्वतंत्र उपक्रमाची आखणी केली आहे.

२२ वर्षांच्या खडतर वाटचालीदरम्यान अवघ्या वर्षभरात अदिती जगन्नाथनने राज्यस्तरावर कॅडेट गटात जेतेपद पटकावलं होतं. मधुरिका पाटकरच्या रूपात राष्ट्रीय विजेती मिळाली आहे. पूजा सहस्रबुद्धेने राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपद पटकावत अकादमीचं नाव उंचावलं आहे. २००० पासून बूस्टर अकादमीचा किमान एक विद्यार्थी राष्ट्रीय संघाचा भाग आहे. २०१४ मध्ये राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ठाण्याने सुवर्णपदकाची कमाई केली आणि ठाणे संघातील सर्वच खेळाडू बूस्टर अकादमीचे होते. आतापर्यंत अकादमीचे १० विद्यार्थी राज्यस्तरीय विजेते आहेत आणि एकूण राज्य अजिंक्यपद स्पर्धेची २७ जेतेपदं अकादमीच्या नावावर आहेत. अकादमीतील बहुतांशी विद्यार्थी खेळाच्या बरोबरीने अभ्यासातही चमकदार कामगिरी करणारे आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात खेळ रुजवण्यात गोहड यांची भूमिका मोलाची आहे. त्यांचं शिस्तीचं वागणं खेळाडूंना घडवण्यात अत्यंत महत्त्वाचं आहे. कितीही मोठं जेतेपद पटकावलेल्या खेळाडूकडून चूक झाल्यास त्याला ओरडा मिळतो. स्पर्धा कुठलीही असली तरी खेळाडूंच्या शिस्तबद्ध देहबोलीवरून तो बूस्टर अकादमीचा आहे, हे स्पष्टपणे जाणवतं.   यतीन टिपणीस, ठाणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे सचिव

राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीआधी मी दडपणाखाली होते. त्या वेळी मॅडमना दूरध्वनी केला. त्या वेळी त्या रुग्णालयात होत्या. मात्र तरीही त्यांचे शब्द माझ्यासाठी आश्वासक ठरले. तू जिंकणार आहेस, कारण तुझी तयारी झाली आहे आणि तुझ्याकडे आत्मविश्वास आहे, अशा शब्दांत त्यांनी सकारात्मक ऊर्जा दिली.   पूजा सहस्रबुद्धे-कोपरकर, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू

प्रशिक्षण देतानाच एक माणूस म्हणून त्यांनी खेळाडूंसमोर ठेवलेला आदर्श उल्लेखनीय आहे. शैक्षणिक क्षेत्रातली उत्तम कारकीर्द सोडून त्यांनी टेबल टेनिससाठी आयुष्य समर्पित केलं आहे, हे योगदान अतुलनीय आहे.   कमलेश मेहता, अर्जुन पुरस्कारप्राप्त टेबल टेनिसपटू व प्रशिक्षक

कणखर प्रशिक्षक असतानाच त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांशी मित्रत्वाचं नातं जपलं आहे. खेळाडू पालकांप्रमाणे त्यांच्याशी सुसंवाद साधतात, यातच त्यांचं मोठेपण आहे. खेळावर त्यांचं निस्सीम प्रेम आहे, म्हणूनच कुटुंबीयांच्या साथीने त्यांनी एवढा मोठा डोलारा उभारला आहे.    इंदू पुरी, माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Table tennis marathi articles
First published on: 28-04-2017 at 03:51 IST