Gautam Gambhi on Team India: पाच कसोटी सामन्यांसाठीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाला पहिला कसोटी सामना सोडल्यास गतविजेत्यांना साजेशी कामगिरी करता आलेली नाही. संघातले काही खेळाडू जरी चांगली कामगिरी करून वेळोवेळी संघाला सावरत असले, तरी सांघिक कामगिरीचा अभाव असल्याचं निरीक्षण अनेक माजी क्रिकेटपटूंकडून नोंदवलं जात आहे. आता खुद्द भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक आणि भारताचा माजी डावखुरा सलामीवीर गौतम गंभीरनं टीम इंडियाला धारेवर धरलं आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत चौथ्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियात काही मोठ्या बदलांची चर्चा होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर कोच सरांनी खेळाडूंची घेतलेली शाळा महत्त्वाची मानली जात आहे.

चौथ्या कसोटी सामन्यात भारताला तब्बल १८४ धावांनी नमवत ऑस्ट्रेलियानं या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. आता भारताला मालिका जिंकणं अशक्य असून शेवटच्या कसोटी सामन्यात विजय मिळाल्यास टीम इंडिया ही मालिका बरोबरीत सोडवेल आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्याकडेच राहील. मात्र, यासाठी पाचवा कसोटी सामना जिंकणं टीम इंडियासाठी आवश्यक आहे. त्यामुळेच प्रशिक्षक गौतम गंभीरनं कंबर कसली असून ड्रेसिंग रूममध्ये बोलताना त्यानं खेळाडूंना चांगलंच धारेवर धरल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

“आता खूप झालं…”

गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या खेळाडूंसमोर ‘आता खूप झालं’ या शब्दांत आपला संताप व्यक्त केला. गंभीरनं यावेळी कोणत्याही खेळाडूचं नाव घेतलं नाही. पण त्याच्या बोलण्याचा पूर्ण रोख हा काही खेळाडू कशाप्रकारे परिस्थितीनुसार खेळण्याऐवजी ‘नैसर्गिक खेळा’च्या नावाखाली हवं तसं खेळत होते, असाच होता.

सहा महिन्यांपासून खेळाडूंना मोकळीक

दरम्यान, यावेळी गंभीरनं गेल्या सहा महिन्यांपासून खेळाडूंना त्यांच्या खेळाबद्दल मोकळीक दिली होती, पण आता कशा प्रकारे खेळायचं हे सांगणार असल्याचं नमूद केलं. गौतम गंभीरनं ९ जुलै रोजी टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून आपण खेळाडूंना मोकळीक देत असून आता मात्र खूप झालं, असं त्यानं स्पष्ट शब्दांत टीम इंडियाच्या खेळाडूंना सुनावलं आहे. शिवाय आता जे खेळाडू त्यानं ठरवून दिलेल्या नियोजनानुसार खेळ करणार नाहीत, त्यांना संघाबाहेर राहावं लागेल, असा सज्जड दमच कोच सरांनी दिला आहे.

IND vs AUS : ‘रोहित-विराटला बाहेर करायला हिंमत लागते…’, माजी भारतीय खेळाडूचे बीसीसीआयला आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौथ्या कसोटीतील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा व माजी कर्णधार विराट कोहली यांच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे. या दोघांनी आधीच टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात टीम इंडियामध्ये काही मोठे बदल दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.