Team India In Honkong Super Sixes: हाँगकाँग सुपर सिक्सेस २०२५ स्पर्धेत भारतीय संघाचा सुपरफ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार अवघ्या २ धावांनी विजय मिळवला होता. हा भारताचा या स्पर्धेतील एकमेव विजय ठरला. कारण त्यानंतर पुढील चारही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा या स्पर्धेतील प्रवास इथेच संपला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे.

भारतीय संघ रविवारी (९ नोव्हेंबर) स्पर्धेतील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. भारताचा शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध पार पडला. या सामन्यातही भारतीय संघाला ४८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात दिनेश कार्तिकला विश्रांती दिली गेली होती. त्याच्या जागी स्टुअर्ट बिन्नी भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून आला.

भारतीय संघाचा सुपरफ्लॉप शो

या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध पार पडला. या सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लागला. भारतीय संघ २ धावांनी पुढे होता. त्यामुळे भारतीय संघाने विजयाने सुरुवात केली. पण त्यानंतर पुढील चारही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मुख्य बाब म्हणजे भारतीय संघाला युएई, कुवेत, नेपाळ आणि श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला.

अंतिम सामन्यातही भारतीय संघाचा पराभव

सलग ३ पराभवानंतर भारतीय संघाचा प्रवास इथेच संपला होता. पण श्रीलंकेला पराभूत करून भारतीय संघ शेवट गोड करेल असं वाटलं होतं. पण असं काहीच झालं नाही. दिनेश कार्तिकऐवजी स्टुअर्ट बिन्नीने संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली आणि सामना ४८ धावांनी गमावला. या सामन्यात श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ६ गडी बाद १३८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला ३ गडी बाद ९० धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघाकडून भरत चिप्लीने ४१ आणि कर्णधार स्टुअर्ट बिन्नीने नाबाद २५ धावांची खेळी केली. गोलंदाजीसह फलंदाजीतही भारतीय खेळाडू मागे राहिले. त्यामुळे हा सामना गमवावा लागला.