राम मंदिरातील राम मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी या दिवशी पार पडणार आहे. २२ जानेवारी या दिवशी अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. या दिवशी देशात दिवाळी साजरी केली जावी असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच या सोहळ्याचं निमंत्रणही विविध दिग्गजांना दिलं जातं आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळाल्यानंतर भारताच्या क्रिकेटपटूने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
हा क्रिकेटर आहे व्यंकटेश प्रसाद. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन व्यंकटेश प्रसादने राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळाल्याचं म्हटलं असून त्याने यासंदर्भात एक भावूक पोस्टही लिहिली आहे. व्यंकटेश प्रसादची X वरची ही पोस्ट चांगलीच व्हायरलही झाली आहे.
काय म्हटलं आहे व्यंकटेश प्रसादने?
“मी हयात असेपर्यंत राम मंदिराची निर्मिती आणि त्यात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्हावी अशी माझी अपेक्षा आणि इच्छा होती. राम मंदिर बांधलं गेलं आणि २२ जानेवारी या दिवशी उद्घाटन सोहळा आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण मला मिळालं यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. या निमंत्रणासाठी मी आभार व्यक्त करतो.” असं म्हणत व्यंकटेश प्रसादने X या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. तसंच निमंत्रण मिळाल्याचा फोटोही पोस्ट केला आहे. या पोस्टची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
क्रिकेटर व्यंकटेश प्रसाद हे भारतीय संघात गोलंदाज होते. २००७ मध्ये झालेल्या T20 वर्ल्ड कप विजेत्या टीमचे ते बॉलिंग कोचही होते. व्यंकटेश प्रसाद यांनी त्यांच्या कारकिर्दीत ३३ कसोटी सामन्यांमध्ये ९६ विकेट घेतल्या आहेत. तर १६१ वन डे सामन्यांमध्ये १९६ विकेट घेतल्या आहेत. आता राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण मिळाल्यानंतर व्यंकटेश प्रसाद भावूक झाल्याचं त्यांच्या पोस्टवरुनच कळतं आहे. मी माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण २२ जानेवारीला अनुभवणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.