VIDEO : टीम इंडियाची धमाल-मस्ती… कुलदीपने केली शमीची भन्नाट नक्कल

सामना संपल्यानंतर मैदानावरच केली नक्कल

विंडीजच्या लेंडल सिमन्सच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर दुसऱ्या टी २० सामन्यात भारतावर मात केली. विजयासाठी दिलेलं १७१ धावांचं आव्हान विंडीजने २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत विंडीजच्या फलंदाजांनी तिरुअनंतपुरमच्या मैदानावर फटकेबाजी केली. ८ गडी राखून मिळवलेल्या या विजयासह वेस्ट इंडीजने मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.

या सामन्यानंतर रोहित शर्मा याने कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यात रोहितने दोघांनाही एक प्रश्न विचारला. तुम्हाला जर भारतीय संघातील एखाद्या खेळाडूची नक्कल करायची असेल तर तुम्ही कोणाची नक्कल कराल? त्यावर चहलने रोहितचीच नक्कल केली पण ती रोहितला फारशी पसंत पडली नाही. त्यानंतर कुलदीप यादवने मात्र शमीच्या आवाजाची आणि लहेजाची उत्तम नक्कल केली.

पहा –

कुलदीपने नक्कल केल्यानंतर रोहितलाही हसू अनावर झाले. रोहितने इतरही काही भन्नाट प्रश्न त्या दोघांना विचारले. हैदराबाद शहराबद्दल काय आवडतं? संघातील सर्वात घाणेरडा डान्सर कोण? सर्वात वाईट हेअसस्टाईल कोणाची? कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करायला आवडणार नाही? असे काही प्रश्न त्याने विचारले. त्या प्रश्नांचा दोघांनीही भन्नाट उत्तरं दिली.

पहा पूर्ण व्हिडीओ –

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामन्यात रोहित झटपट बाद झाला. विशेषकरुन रोहित शर्माचं गेल्या काही सामन्यांपासून भारतीय मैदानांवरचं अपयश हे संघासाठी चिंताजनक ठरलं आहे. आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये भारतीय मैदानावर गेल्या ९ सामन्यांमध्ये एका सामन्याचा अपवाद वगळता रोहित शर्मा पूर्णपणे अपयशी ठरला आहे. बांगलादेशविरुद्ध राजकोट येथे झालेल्या सामन्यात केलेली ८५ धावांची खेळी ही त्याची गेल्या ९ सामन्यांमधील सर्वोत्तम खेळी आहे. त्या व्यतिरिक्त ८ सामन्यात त्याला २० धावांचा टप्पाही गाठता आलेला नाही. त्यामुळे आता रोहितच्या फॉर्मवरही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Team india gossip funny video kuldeep yadav mimics mohammad shami in interview rohit sharma yuzvendra chahal vjb