Joe Root Run Out: इंग्लंडचा संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असतो, तेव्हा जो रूट खंबीरपणे उभा राहतो. मँचेस्टर कसोटीतील पहिल्या डावात इंग्लंडच्या सलामीवीरांनी चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर २ मोठे धक्के बसल्यानंतर जो रूटने ओली पोपसोबत मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला. यादरम्यान त्याने दमदार अर्धशतकी खेळी केली आणि संघाची धावसंख्या लंचपर्यंत ३३२ धावांवर पोहोचवली आहे. यादरम्यान भारतीय संघाकडे त्याला बाद करण्याची सोपी संधी होती. पण थोडक्यात संधी हुकल्याने जो रूटला जीवदान मिळालं.

जो रूट सहज आपला विकेट फेकून जात नाही. त्याला बाद करायचं असेल, तर त्याला सापळा रचून अचूक टप्प्यावर चेंडू टाकावा लागतो किंवा मग धावबाद होऊ शकतो. मँचेस्टरच्या मैदानावरील खेळपट्टी पाहता, जो रूट लवकर बाद होण्याची शक्यता खूप कमी आहे. पण त्याला बाद करण्याची सोपी संधी निर्माण झाली होती. पण भारतीय खेळाडूंच्या चुकीमुळे त्याला जीवदान मिळालं. रवींद्र जडेजाने मारलेला थ्रो जर यष्टीला जाऊन लागला असता, तर जो रूटला माघारी परतावं लागलं असतं.

नेमकं काय घडलं?

या सामन्यातील तिसऱ्या दिवशी इंग्लंडकडून जो रूट आणि ओली पोपची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आली. या दोघांनी मिळून इंग्लंडला दमदार सुरूवात करून दिली. मात्र,जो रूट ५४ व्या षटकात बाद होण्यापासून थोडक्यात बचावला. तर झाले असे की, भारतीय संघाकडून ५४ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला. या षटकातील शेवटच्या चेंडूवर जो रूट स्ट्राईकवर होता. त्यावेळी सिराजने टाकलेला चेंडू हा रूटच्या ग्लोव्ह्जला लागून गलीच्या दिशेने गेला.

गलीमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या जडेजाने हा चेंडू अडवला. इतक्यात नॉन स्ट्राईकला असलेला ओली पोप धाव घेण्यासाठी धावला. पोपने निम्म्यापेक्षा अधिकचं अंतर पार केल्यानंतर जो रूटला धावण्यासाठी सांगितलं. इतकं होऊनही नॉन स्ट्राईक एंडला एकही खेळाडू नव्हता. जडेजाने थ्रो केला. पण त्याचा थ्रो थोडक्यात हुकला. जर एखादा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला थांबला असता, तर रूट बाद होऊन माघारी परतला असता. त्यामुळे जडेजालाही राग अनावर झाला.

इंग्लंड मजबूत स्थितीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव ३५८ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने ८४ धावांची खेळी केली. तर बेन डकेटने ९४ धावांची खेळी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १६६ धावा जोडल्या. त्यानंतर ओली पोप आणि जो रूटने महत्वपूर्ण भागीदारी केली. तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्राअखेर ओली पोप ७० तर जो रूट ६३ धावांवर नाबाद आहे. इंग्लंडने ३३२ धावा केल्या आहेत.