Team India Playing 11, IND vs ENG 5th Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना मालिकेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. इंग्लंडचा संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ शेवटचा सामना जिंकून ही मालिका ३-१ ने आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे भारतीय संघ हा सामना जिंकून मालिका १-१ ने बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघाच्या अंतिम अकरात मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऋषभ पंत दुखापतग्रस्त झाला होता. तरीदेखील तो धाडस करून चौथा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. मात्र, या सामन्यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला शेवटच्या कसोटी सामन्यातून बाहेर पडावं लागलं आहे. त्याच्या जागी एन जगदीशनचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पाचव्या कसोटीत यष्टीरक्षक म्हणून ध्रुव जुरेलला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. यासह आणखी एक मोठा बदल म्हणजे कुलदीप यादवला अंतिम अकरामध्ये संधी दिली जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. कारण त्याला या मालिकेतील एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे शेवटच्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हे ३ फिरकी गोलंदाज अंतिम अकराचा भाग असू शकतात.
जसप्रीत बुमराह खेळणार का?
या मालिकेची सुरूवात होण्यापूर्वीच बीसीसीआयने स्पष्ट केलं होतं की, जसप्रीत बुमराह ५ पैकी ३ सामने खेळणार. आता पहिला, तिसरा आणि चौथा सामना खेळल्यानंतर त्याचे ३ कसोटी सामने पूर्ण झाले आहेत. मालिकेतील शेवटचा सामना निर्णायक असला तरीदेखील बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला हा सामना न खेळण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो ओव्हल कसोटीत खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याच्या जागी अर्शदीप सिंगला खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. तसेच गेल्या सामन्यात दुखापतीमुळे संघाबाहेर राहिलेला आकाशदीप या सामन्यात पुनरागमन करणार आहे. त्यामुळे बुमराहच्या अनुपस्थितीतही भारतीय संघाचं वेगवान गोलंदाजी आक्रमण आणखी भक्कम होऊ शकते. हे ४ बदल सोडले, तर उर्वरीत संघात कुठलाही बदल केला जाणार नाही.
मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते संधी
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाशदीप, अर्शदीप सिंग.