India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या लॉर्ड्स कसोटीचा निकाल हा शेवटच्या दिवशी लागणार आहे. इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांवर आटोपल्यानंतर, भारतीय संघाला देखील ३८७ धावा करता आल्या. त्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव १९२ धावांवर आटोपला. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९३ धावा करायच्या आहेत. भारतीय संघाने चौथ्या दिवसाअखेर ४ गडी बाद ५८ धावा केल्या आहेत. हे आव्हान जरी छोटं असलं, तरीदेखील सोपं मुळीच नसणार आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर धावांचा पाठलाग करताना कसा राहिला आहे रेकॉर्ड? जाणून घ्या.
लॉर्ड्सला क्रिकेटची पंढरी असं म्हणतात. त्यामुळे या मैदानावर सामना जिंकणं हे कुठल्याही संघासाठी अतिशय खास असतं. आता कपिल देव, एमएस धोनी आणि विराट कोहलीनंतर युवा कर्णधार शुबमन गिलकडेही या खास क्षण अनुभवायची संधी चालून आली आहे. पण लॉर्ड्सचा निकाल भारतीय संघाच्या बाजूने लागणार का? हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. या मैदानावर आतापर्यंत ७ वेळेस १९० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला गेला आहे. या रेकॉर्डमध्ये भारतीय संघाचं नाव नाही. भारताने १९८६ मध्ये १३६ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. यासह २०१४ मध्ये २०२१ मध्ये मिळवलेला विजय हा भारतीय संघाने धावांचा बचाव करताना मिळवला होता.
भारतीय संघाला सामन्यातील पाचव्या दिवशी १३५ धावा करायच्या आहेत. भारतीय संघाने जर या धावांचा यशस्वी पाठलाग केला, तर हा लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने केलेला आतापर्यंतचा यशस्वी पाठलाग असेल. भारतीय संघासमोर असलेलं आव्हान फार मोठं नाही. पण भारतीय संघाचं टेन्शन वाढवणारी बाब म्हणजे, भारताचे ४ फलंदाज तंबूत परतले आहेत.
लॉर्ड्सच्या मैदानावर सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करणारे संघ
वेस्टइंडिज विरूद्ध इंग्लंड- १ गडी बाद ३४४ धावा, १९८४
इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड – ३ गडी बाद २८२ धावा, २००४
दक्षिण आफ्रिका विरूद्ध ऑस्ट्रेलिया- ५ गडी बाद २८२ धावा , २०२५
इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड -५ गडी बाद २७९ धावा, १९६५
इंग्लंड विरूद्ध वेस्टइंडिज – ५ गडी बाद १९३ धावा, २०१२
इंग्लंड विरूद्ध वेस्टइंडिज – ८ गडी बाद १९१ धावा, २०००