१९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातला सामना सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरु आहे. उपांत्य फेरीत पाकिस्तानवर मात करत भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. तर बांगलादेशने न्यूझीलंडवर मात करत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. संपूर्ण देशभरातून प्रियम गर्गच्या भारतीय संघाला अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

विराट कोहलीचा भारतीय संघही अंतिम सामन्यासाठी आपल्या युवा खेळाडूंना पाठींबा देतो आहे. न्यूझीलंडमध्ये भारतीय संघाचे खेळाडू प्रशिक्षक रवी शास्त्रींसमवेत टीव्हीवर सामना पाहत असल्याचा फोटो बीसीसीआयने ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

दरम्यान अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशी गोलंदाजांनी हवामानाचा फायदा घेत भारतीय फलंदाजांना चांगलचं तंगवलं. दिव्यांश सक्सेनाला झटपट माघारी धाडण्यात बांगलादेशला यश आलं. मात्र त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरला.