फुटबॉल मोसमाचा थरार संपुष्टात आल्यानंतर आता चाहत्यांना रंगतदार टेनिसची पर्वणी मिळणार आहे. वर्षांतल्या दुसऱ्या ग्रँड स्लॅम स्पर्धेद्वारे त्यांना फ्रेंच स्पर्धेचा लाल मातीतला थरार अनुभवता येणार आहे. टेनिसमधील प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकणाऱ्या दिग्गज खेळाडूंची लाल मातीच्या कोर्टावर खेळताना होणारी दमछाक.. क्ले-कोर्टचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राफेल नदालला खुणावत असलेले आठवे जेतेपद.. नदालची मक्तेदारी मोडण्यासाठी सज्ज असलेले रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच, अँडी मरे.. महिला टेनिसपटूंमध्ये असलेली जेतेपदासाठीची चुरस.. अशी मेजवानी टेनिसचाहत्यांना मिळणार आहे.
पॅरिसजवळील रोलँड गॅरोस क्रीडा संकुलात दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धेकरिता टेनिस चाहते खूपच उत्सुक झालेले असतात. टेनिसमध्ये नवनवीन तंत्र आले असले, तरी या स्पर्धेत भल्याभल्या खेळाडूंनाही नतमस्तक व्हावे लागते. अन्य टेनिस कोर्ट्सवर वेगवान सव्‍‌र्हिस करीत सहजपणे गुण मिळविता येतात. फ्रेंच खुल्या स्पध्रेमध्ये त्यास अपवाद पाहावयास मिळतो. येथील क्ले कोर्ट्सवर सव्‍‌र्हिस केल्यानंतर चेंडूचा वेग कमी होतो. पण त्याचबरोबर चेंडू उसळी मारूनही येतो. त्यामुळे मोठमोठय़ा सव्‍‌र्हिस व व्हॉली करणाऱ्या खेळाडूंना येथे अव्वल दर्जाचे यश मिळविताना नाकीनऊ येते. ‘टेनिससम्राट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीट सॅम्प्रासने अन्य तीनही ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये निर्विवाद वर्चस्व गाजविले. मात्र येथे त्याला आपला प्रभाव दाखविता आला नाही. १९९६मध्ये त्याने या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. हीच त्याची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. जॉन मॅकेन्रो, स्टीफन एडबर्ग, बोरिस बेकर, व्हीनस विल्यम्स, मार्टिना हिंगिस, लिंडसे डेव्हनपोर्ट, नोव्हाक जोकोव्हिच या खेळाडूंनी अन्य ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये विजेतेपदाची लयलूट केली. मात्र रोलँड गॅरोस कोर्ट्सने त्यांना चकवा दिला. ताशी जवळ जवळ अडीचशे किलोमीटर वेगाने सव्‍‌र्हिस करणाऱ्या अँडी रॉडिक याचीही येथे दमछाक झाली. त्याला येथे कधीही उपांत्य फेरीत पोहोचता आले नाही.
संथ मैदानावर हुकमत गाजविणाऱ्या खेळाडूंना येथे वर्चस्व गाजविता येते. राफेल नदाल, मॅट्स विलँडर, ब्योन बोर्ग, इव्हान लेंडल, जस्टीन हेनिन, मोनिका सेलेस या खेळाडूंनी येथे वर्चस्व गाजविले आहे. नदाल याने २००५ ते २००८ व २०१० ते २०१२ अशी एकूण सात विजेतेपदे मिळविली. २००९मध्ये त्याला दुखापतीमुळे ग्रासले होते, अन्यथा त्या वर्षीही त्यानेच ही स्पर्धा जिंकली असती. क्ले कोर्टचा बादशाह म्हणून त्याची ख्याती आहे आणि या नावलौकिकास साजेसा खेळ त्याने येथे केला आहे. फ्रेंच व विम्बल्डन स्पर्धामध्ये खूपच विरोधाभास पाहावयास मिळतो. विम्बल्डनमध्ये ग्रासकोर्टवर सामने होत असल्यामुळे तेथे वेगवान सव्‍‌र्हिस व व्हॉली करणाऱ्या खेळाडूंची हुकमत चालते. ‘सव्‍‌र्हिस करा आणि गेम जिंका’ असेच तेथे सांगितले जाते. फ्रेंच व विम्बल्डन या दोन्ही स्पर्धा जिंकण्यासाठी अतिशय अव्वल दर्जाचे कौशल्य आवश्यक असते. तथापि, ही किमया रॉड लिव्हर, जॉन कोडेस, आंद्रे आगासी, ब्योन बोर्ग, राफेल नदाल, रॉजर फेडरर आदी खेळाडूंनी दाखविली आहे. फ्रेंच स्पर्धा ही क्लेकोर्टवरील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेत पाचव्या सेटमध्ये टाय-ब्रेकर घेतला जात नाही. त्यामुळे दीर्घकाळ सामने रंगत जातात. पाच सेट्सपर्यंत सामना चालला, तर तेथे अनुभवी खेळाडूंच्याही शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीची कसोटी पाहायला मिळते.
फ्रेंच स्पर्धेचा श्रीगणेशा १८९१मध्ये झाला. महिलांकरिता १८९७पर्यंत या स्पर्धेत सहभागी होण्यास मनाई होती. सुरुवातीला ही स्पर्धा फक्त फ्रेंच खेळाडूंसाठी मर्यादित होती. कालांतराने या स्पर्धेची दारे अन्य परदेशी खेळांडूकरिता खुली झाली. १९६८पासून हौशी खेळाडूंबरोबरच व्यावसायिक खेळांडूंकरिताही या स्पर्धेत खेळण्याची संधी उपलब्ध झाली. १९६८ पूर्वी जेव्हा ही स्पर्धा फक्त फ्रेंच खेळाडूंपुरती मर्यादित होती, त्या कालावधीत मॅक्स डेकुगिस याने आठ वेळा ही स्पर्धा जिंकण्याची किमया केली होती. १९६८ नंतर नदाल याने सर्वाधिक सात वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. महिलांमध्ये १९६८ पूर्वी जीएनी मॅथ्यूज व सुझाना लेगलेन यांनी प्रत्येकी चार वेळा ही स्पर्धाजिंकली. १९६८ नंतर मोनिका सेलेस व जस्टीन हेनिन यांनी प्रत्येकी तीन वेळा ही स्पर्धा जिंकण्याचा मान मिळविला आहे. सेलेस हिने सर्वात तरुण विजेती होण्याचीही कामगिरी केली आहे. तिने १६ वर्षे सहा महिने वय असताना ही स्पर्धा पहिल्यांदा जिंकली. ख्रिस एव्हर्ट हिने ३१ वर्षे सहा महिने वय असताना या स्पर्धेत विजेतेपद मिळवीत आपल्या चापल्यतेचा प्रत्यय घडविला होता. पुरुषांमध्ये मायकेल चँग याने सर्वात तरुण विजेता होण्याची कामगिरी केली, त्या वेळी त्याचे वय होते १७ वर्षे तीन महिने. आंद्रेस गिमेनो याने ३४ वर्षे १० महिने वय असतानाही अजिंक्यपद मिळवीत आपल्या सफाईदार खेळाचा प्रत्यय घडविला होता. मार्सेल बर्नार्ड (१९४६), मॅट्स विलँडर (१९८२), गुस्ताव क्युर्टेन (१९९७), गेस्टॉन गॉडिओ (२००४), मार्गारेट श्रीव्हन (१९३३) यांनी बिगरमानांकित खेळाडूने ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
भारतीय खेळाडूंना दुहेरीत येथे चांगले यश मिळाले आहे. महेश भूपती याने १९९९ व २००१ मध्ये लिएण्डर पेसच्या साथीने पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळविले आहे. पेसने २००९मध्ये लुकास दलौही याच्या साथीतही अजिंक्यपद मिळविले आहे. भूपती याने १९९७ मध्ये रिका हिराकी हिच्या साथीत तर गतवर्षी सानिया मिर्झा हिच्या साथीने मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद मिळविले आहे.
बलाढय़ खेळाडूंनाही चकवा देणाऱ्या या स्पर्धेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या १५ हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता असलेले स्टेडियमही अपुरे होऊ लागले आहे. २०१६मध्ये या क्रीडा संकुलाचे नूतनीकरण होऊ घातले आहे. तोपर्यंत तरी जागा न मिळालेल्या प्रेक्षकांना विविध चॅनेल्सद्वारे थेट प्रक्षेपणाच्या आनंदावर समाधान मानावे लागणार आहे.