वृत्तसंस्था, लंडन : सर्बियाचा तारांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने पुन्हा एकदा करोना प्रतिबंधात्मक लस घेणार नसल्याचे स्पष्ट केले असून पुढील महिन्यात होणाऱ्या अमेरिकन खुल्या स्पर्धेतील त्याच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह आहेत. अग्रमानांकित जोकोव्हिचने रविवारी ऑस्ट्रेलियाच्या निक किरियॉसवर सरशी साधत सातव्यांदा विम्बल्डन, तर २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर कब्जा केला. त्यामुळे सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या पुरुष टेनिसपटूंच्या यादीत त्याने दुसरे स्थान मिळवले असून त्याच्यात आणि अग्रस्थानावरील राफेल नदालमध्ये (२२) केवळ एका जेतेपदाचा फरक आहे. आता अमेरिकन स्पर्धा जिंकून नदालशी बरोबरी करण्यास जोकोव्हिच उत्सुक आहे. मात्र, त्याने अजूनही करोना प्रतिबंधात्मक लस न घेतल्याने त्याला अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही. परिणामी तो वर्षांतील अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळू शकणार नाही. परंतु अमेरिकन सरकार लससक्तीच्या नियमात बदल करेल अशी जोकोव्हिचला आशा आहे.
‘‘मी करोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली नसून ती घेण्याचा माझा विचारही नाही. त्यामुळे अमेरिकेतील लससक्तीचा नियम हटवल्याशिवाय किंवा मला सूट मिळाल्याशिवाय, मी या स्पर्धेत खेळणे अशक्य आहे. मला सूट मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे त्यांनी या स्पर्धेपूर्वी नियमात बदल केला, तरच मी अमेरिकेत प्रवेश करू शकेन. परंतु, मला आयोजकांकडून चांगली बातमी मिळेल अशी आशा आहे,’’ असे जोकोव्हिचने नमूद केले.
करोना लस न घेतल्यामुळे जोकोव्हिचला या वर्षांच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत खेळता आले नव्हते. त्याला ऑस्ट्रेलियातून परत पाठवण्यात आल्याने बराच वादही निर्माण झाला होता. या घटनेतून सावरण्यासाठी बराच वेळ गेल्याचे जोकोव्हिचने सांगितले. ‘‘सुरुवातीचे काही महिने माझ्यासाठी खूप अवघड होते. मानसिक आणि भावनिकदृष्टय़ा मी खचलो होतो. त्या प्रकरणानंतर मी पहिल्यांदा दुबईतील स्पर्धेत खेळलो, त्यावेळी मला खूप दडपण जाणवत होते. मात्र, मी संयम राखणे गरजेचे असल्याचे स्वत:ला समजावले. त्यानंतर परिस्थितीत सुधारणा होत गेली,’’ असे जोकोव्हिच म्हणाला.
जागतिक क्रमवारीत घसरण
पॅरिस : सलग चौथ्यांदा विम्बल्डन स्पर्धा जिंकूनही जोकोव्हिचची जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. रशियाने युक्रनेवर केलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंवर यंदाच्या विम्बल्डनमध्ये बंदी घालण्यात आली होती. या निर्णयाच्या निषेधार्थ व्यावसायिक टेनिस संघटना (एटीपी) आणि महिला टेनिस संघटना (डब्ल्यूटीए) यांनी विम्बल्डनमध्ये खेळाडूंना क्रमवारीचे गुण न देण्याचे ठरवले. याचा जोकोव्हिचला फटका बसला आहे. रशियाचा डॅनिल मेदवेदेव्हने अग्रस्थान राखले असून जायबंदी अलेक्झांडर झ्वेरेव्हला दुसऱ्या स्थानी बढती मिळाली.