थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूला अंतिम फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. जपानच्या नोझुमी ओकुहाराने सिंधूचा २१-१५, २१-१८  असा पराभव केला.

याआधी जपानची नोझुमी ओकुहारा आणि सिंधू हे अनेक स्पर्धांमध्ये समोरासमोर आलेले आहेत. यात ओकुहाराचं पारडं सिंधूपेक्षा जड असल्यामुळे, सिंधू या सामन्यात आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला कशी टक्कर देते याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र पहिल्या सेटपासून नोझुमीने आघाडी घेत सिंधूला बॅकफूटवर ढकलायला सुरुवात केली. सिंधूच्या कच्च्या दुव्यांचा अभ्यास करुन आलेल्या नोझुमीने आक्रमक खेळ करत पहिल्या सेटवर आपलं वर्चस्व गाजवलं. सिंधूला वारंवार नेटजवळ गुंतवून ठेवत नोझुमीने झटपट गुणांची वसुली केली. पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत ओकुहाराकडे ११-८ अशी आघाडी होती. मध्यांतरानंतर सिंधू नोझुमीला आव्हान देईल अशी आशा होती. मात्र ओकुहाराने सेटवरील आपली पकड ढिली न होऊ देता २१-१५ च्या फरकाने सेट आपल्या खिशात घातला.

दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने आक्रमक सुरुवात करत आपल्याकडे आघाडी घेतली. सिंधूने आपल्या ठेवणीतलं अस्त्र बाहेर काढत ओकुहाराला चांगलच हैराण केलं. दुसरा सेट सुरु झाल्यानंतर काही मिनीटांमध्ये सिंधूकडे ४ गुणांची आघाडी होती. मात्र ओकुहाराने शांतपणे खेळ करत सिंधूची झुंज मोडून काढत आघाडी कमी केली. मध्यांतरापर्यंत सिंधूने ११-९ अशी दोन गुणांची आघाडी घेतली होती. मात्र मध्यांतरानंतर ओकुहाराने दमदार पुनरागमन करत सिंधूला पुन्हा मागे टाकलं. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चांगल्या रॅली रंगताना पहायला मिळाल्या, मात्र नोझुमी ओकुहाराने चतुरस्त्र खेळ करत ड्रॉप फटक्यांचा वापर करत पॉईंटची कमाई केली. सिंधूने काही क्षणासाठी ओकुहाराला टक्कर देण्याचाप्रयत्न केला, पण ओकुहाराने सिंधूची डाळ शिजू दिली नाही. अखेर २१-१८ च्या फरकाने सेट जिंकत ओकुहाराने सामनाही आपल्या नावे केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.