अनुराधा डोणगावकर, महाराष्ट्राची कबड्डी प्रशिक्षक
‘‘महाराष्ट्राचा संघ निवडण्याची प्रक्रिया सुधारण्याची नितांत आवश्यकता आहे. निवड समितीने आपल्याला संघ द्यावा आणि आपण तो राष्ट्रीय स्पध्रेत खेळवून आणावा, यासाठी तर आपण नक्कीच जात नाही. आपण महाराष्ट्राची अस्मिता घेऊन जातो. महाराष्ट्राला जिंकून देण्याचे स्वप्न जोपासून जर आपण जात असू, तर प्रशिक्षकाला निवड प्रक्रियेत स्थान देण्याची आवश्यकता आहे,’’ असे मत महाराष्ट्राच्या महिला कबड्डी संघाच्या प्रशिक्षक अनुराधा डोणगावकर यांनी व्यक्त केले.
डोणगावकर पुढे म्हणाल्या, ‘‘संघाकडून कोणते यश प्राप्त करून घ्यायचे आहे, याची प्रशिक्षकाला जाणीव असते. त्यामुळेच निवड समिती आणि प्रशिक्षक यांच्यात समन्वय हवा. संघाची निवड निश्चित करण्यापूर्वी प्रशिक्षकाशी संघाविषयी चर्चा व्हायलाच हवी. ज्यात मतभिन्नता असू शकते, परंतु त्यातून योग्य मार्ग आपण काढू शकतो.’’
१९८१ मध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने पश्चिम बंगालला नमवून अखेरचे जेतेपद प्राप्त  केले होते. त्यानंतर सुमारे ३३ वष्रे राष्ट्रीय विजेतेपदाने महाराष्ट्राला हुलकावणी दिली आहे. तामिळनाडूमधील त्रिचनगुड येथे १४ ते १८ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेसाठी महाराष्ट्राचा संघ डोणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात सज्ज होत आहे. १२ वष्रे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि भारतीय संघात खेळण्याचाही अनुभव गाठीशी असणाऱ्या डोणगावकर सध्या बँक ऑफ बडोदामध्ये कार्यरत आहेत. स्थानिक कबड्डीमध्ये दबदबा असलेल्या नाशिकच्या गुलालवाडी संघाकडून त्या खेळायच्या. २००१-०२ मध्ये त्या शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. याशिवाय नारायणी स्पोर्ट्स अकादमी यांच्यासारख्या अनेक क्रीडा संस्थांमधून क्रीडाविषयक उपक्रमांत हिरिरीने त्या सहभागी असतात. राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेच्या आगामी आव्हानाविषयी त्यांच्याशी केलेली खास बातचीत-
* मागील वर्षी राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेत महाराष्ट्राच्या महिलांनी तिसरे स्थान मिळवले होते, यंदा तुम्हाला या संघाकडून कोणत्या अपेक्षा आहेत?
गतवर्षी महाराष्ट्राचा संघ उपांत्य फेरीत हरयाणाकडून हरला होता. या वेळी आम्ही अंतिम फेरीत नक्की असू, अशी माझी अपेक्षा आहे. हरयाणासह हिमाचल प्रदेश, भारतीय रेल्वे या संघांचे महाराष्ट्रापुढे प्रमुख आव्हान असेल. गेली काही वष्रे विभागीय राष्ट्रीय स्पध्रेतून अव्वल राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेसाठी विजेता आणि उपविजेता संघ पात्र व्हायचा; परंतु यंदा मात्र थेट राष्ट्रीय स्पध्रेत सर्व संघ खेळतील. त्यामुळे सामनेही जास्त होतील आणि रंगत आणखी वाढेल. या वर्षी मानांकन नसल्यामुळे कोणत्या गटात, कोणत्या संघांसोबत महाराष्ट्राचा समावेश असेल, ही उत्सुकता आहे. परंतु अव्वल संघांशी आपली उपांत्यपूर्व किंवा उपांत्य फेरीत आपली गाठ पडू शकेल, हे मात्र निश्चित.
* महाराष्ट्राचा संघ वर्षांनुवष्रे रेल्वेकडून हरतो. नेमक्या कोणत्या उणिवा या संघात आहेत?
मीसुद्धा अनेक वष्रे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. महाराष्ट्राचा संघ रेल्वेकडून हरण्याचे महत्त्वाचे कारण हे मानसिक आहे. रेल्वेच्या आणि महाराष्ट्राच्या खेळात तसे साम्य आहे; परंतु कुठेतरी दडपण हाताळण्यात आपण कमी पडतो. आपण त्यादृष्टीने योग्य तयारी केली, तर संघासाठी ते फायदेशीर ठरेल. रेल्वेचा संघ हा व्यावसायिक असल्यामुळे त्यांचा सांघिक खेळ हा एकत्रितच होत असतो. दुसरीकडे महाराष्ट्राचा संघ निवडल्यानंतर फार थोडे दिवस एकत्रित सरावाला मिळतात.
* महाराष्ट्राचे कच्चे दुवे तुम्हाला माहीत आहेत. ते दूर करण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न करत आहात?
हे बदल एका रात्रीमध्ये नाही घडू शकत. जेवढे दिवस सराव शिबिराला मिळतात, त्या दिवसांत आपल्याला स्पध्रेत नेमके काय करायचे आहे, ही ध्येयनिश्चिती करीत आहोत. बऱ्याचदा या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीत. आपल्या अनुभवांतून आणि अभ्यासातून ते आपल्याला उमगत जाते. आपल्यातील सर्वोत्तम काय आहे, यापेक्षा चुकांच्या चर्चा जास्त होतात. सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकता केंद्रस्थानी येते. मागील वर्षी काय घडले, त्यापेक्षा आता तुम्हाला काय घडवायचे आहे, याकडे लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते. जसे आपण रणनीती आखतो, तसेच प्रतिस्पर्धी संघसुद्धा विचार करून खेळतो.
* पुण्यात चालू असलेल्या सराव शिबिरात तुम्ही प्रामुख्याने कशावर भर देत आहात?
महाराष्ट्राच्या क्षेत्ररक्षणाची फळी सज्ज करणे आणि त्यांचे संघातील स्थान निश्चित करणे, हे माझे प्रमुख लक्ष्य आहे. याचप्रमाणे पाच, चार, तीन आदी क्षेत्ररक्षणांसह जो संघ प्रतिस्पर्धी चढाईपटूला जेरबंद करतो, त्याला जिंकण्याची अधिक संधी असते.
*  महाराष्ट्राचा संघ जाहीर झाल्यानंतर काही हरहुन्नरी खेळाडू संघात नसल्याची क्रीडारसिकांमध्ये जोरदार चर्चा आहे, याबाबत तुम्ही काय सांगाल?
संघ निश्चित करताना विशिष्ट स्थानांचा पूर्ण विचार करण्याची गरज असते. याचप्रमाणे काही पर्यायसुद्धा तुमच्याकडे उपलब्ध असायला हवे असतात. कुणालाही दुखापत झाल्यास किंवा रणनीतीमध्ये बदल करायचा झाल्यास हाच पर्याय तुमच्यासाठी उपयुक्त ठरतो. पर्यायच उपलब्ध नसेल तर मात्र परिस्थिती कठीण होते. आपण जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पध्रेत सहभागी होण्यासाठी संघ घेऊन नाही जात आहोत, तर महाराष्ट्राच्या संघाचे राष्ट्रीय स्पध्रेत प्रतिनिधित्व करीत आहोत. गतवर्षी आपण उपांत्य फेरीत हरलो आहोत, यंदा आपल्याला अधिक स्पर्धा आहे. या परिस्थितीत आपला संघसुद्धा मजबूत असणे महत्त्वाचे आहे. आता संघात जी नावे आहेत किंवा नाहीत, त्यापेक्षा कुणाचेच नुकसान होऊ नये, ही काळजी घ्यायला हवी. यावर्षी जर एखादी खेळाडू चांगली खेळत असेल, तर तिला संघात न्याय मिळायला हवा. कारण पुढील वर्षी आणखी कुणीतरी चमकदार खेळ करेल आणि मग या चांगल्या खेळाडूला स्थान देताना तिच्यावर अन्याय होणार, हे चक्र कायम चालूच राहणार का?
*  तुमच्या संघात काही आंतरराष्ट्रीय खेळाडूंचाही समावेश आहे. एखाद्या सामन्यात जर या दिग्गज खेळाडूकडून अपेक्षित कामगिरी होत नसेल तर तुम्ही त्वरित बदल करणार का?
अर्थातच होय. कारण प्रत्येक दिवस हा त्या खेळाडूचा असेलच याची खात्री देता येत नाही. सचिन तेंडुलकरसुद्धा काही वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळे आपल्याला जर जिंकायचे असेल तर एखाद्या दिवशी त्या खेळाडूची कामगिरी चांगली होत नसेल, तर बदल करायला काहीच हरकत नाही. शेवटी खेळाडूकडून क्वचितप्रसंगी चुका घडू शकतात, त्याशिवाय तो शिकणार नाही. याचप्रमाणे प्रतिस्पर्धी संघानेही आपल्या खेळाडूंचा अभ्यास केलेला असतो.
* राष्ट्रीय स्पर्धा मॅटऐवजी मातीवर होत आहे, याबद्दल काय सांगाल?
आता अनेक खेळाडूंना मॅटवरील खेळाचे तंत्र चांगले अवगत झाले आहे. महाराष्ट्रात तरी बऱ्यापैकी मॅट उपलब्ध आहेत आणि स्पर्धा होतात, मात्र देशात अन्यत्र त्या तुलनेत मॅट कमी उपलब्ध आहेत. परंतु महाराष्ट्राच्या खेळाडूंना मातीवरील खेळाचे कौशल्य चांगले ज्ञात असल्यामुळे ते आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकेल.
प्रशांत केणी, मुंबई