वृत्तसंस्था, मुंबई
गतउपविजेता आणि ४१ वेळा विजेता मुंबईचा संघ रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी प्रयत्नशील असून मंगळवारपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात त्यांना विजय किंवा पहिल्या डावातील आघाडी गरजेची आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या पुनरागमनाचा मुंबईला दिलासा मिळणार आहे.
एलिट ब-गटातून सौराष्ट्राचा संघ सहा सामन्यांत २६ गुणांसह बाद फेरीत पोहोचला असून दुसऱ्या स्थानासाठी मुंबई आणि महाराष्ट्र या संघांमध्ये स्पर्धा आहे. सध्या महाराष्ट्राचा संघ २५ गुणांसह दुसऱ्या, तर मुंबई २३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवणारा संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल. हा सामना अनिर्णित राहिला आणि मुंबईने पहिल्या डावात आघाडी मिळवली, तरी मुंबईला उपांत्यपूर्व फेरीची संधी निर्माण होईल. या परिस्थितीत मुंबईला तीन गुण मिळतील. त्यामुळे दोन्ही संघांचे एकूण २६ गुण होतील. मात्र, महाराष्ट्राच्या खात्यावर एकही बोनस गुण नसून मुंबईने दोन बोनस मिळवले आहेत. त्यामुळे मुंबईचा संघ आगेकूच करेल व महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात येईल. महाराष्ट्रालाही आगेकूच करण्यासाठी पहिल्या डावातील आघाडी पुरेशी ठरेल.
या सामन्यात मुंबईच्या फलंदाजीची भिस्त कर्णधार अजिंक्य रहाणे, यशस्वी आणि सर्फराज खान यांच्यावर असेल. तडाखेबंद सलामीवीर पृथ्वी शॉ आणि अष्टपैलू शार्दूल ठाकूरची भारतीय संघात निवड झाल्याने हे दोघे या सामन्यात खेळू शकणार नाहीत. गेल्या सामन्यात पृथ्वीच्या साथीने सलामीला आलेला मुशीर खान सध्या २५ वर्षांखालील संघाकडून खेळत आहे. त्यामुळे महाराष्ट्राविरुद्ध यशस्वीच्या साथीने दिव्यांश सक्सेना सलामीला येऊ शकेल.
दुसरीकडे, महाराष्ट्रालाही आंतरराष्ट्रीय खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी यांची उणीव भासेल. त्यांच्या अनुपस्थितीत कर्णधार अंकित बावणे, केदार जाधव आणि गेल्या सामन्यातील शतकवीर नौशाद शेख यांच्यावर महाराष्ट्राच्या फलंदाजीची मदार असेल. गोलंदाजीत मुंबईला शम्स मुलानी आणि तुषार देशपांडे, तर महाराष्ट्राला प्रदीप दाढे आणि राजवर्धन हंगर्गेकर यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. तसेच मुंबईसाठी तनुष कोटियन आणि महाराष्ट्रासाठी आशय पालकर यांचे अष्टपैलू योगदान महत्त्वाचे ठरेल. यंदाच्या हंगामात कोटियनने पाच सामन्यांत तीन अर्धशतके झळकावतानाच २० गडी बाद केले आहेत. पालकरने सहा सामन्यांत एक शतक व दोन अर्धशतके साकारली असून १९ बळी मिळवले आहेत.
जडेजा पुनरागमनासाठी सज्ज
नवी दिल्ली : भारताचा प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजा जवळपास सहा महिन्यांच्या कालावधीनंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला असून मंगळवारपासून सुरू होणाऱ्या तमिळनाडूविरुद्धच्या रणजी सामन्यात तो सौराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे जडेजावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याला बराच काळ मैदानाबाहेर राहावे लागले. परंतु आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी आपली तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी जडेजा उत्सुक आहे. जडेजाने तमिळनाडूविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला एक तासभर गोलंदाजी आणि फलंदाजीचा सराव केला.
