नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या १४व्या हंगामातील उर्वरित सामने १९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येऊ शकतात, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी मंगळवारी दिली.

जैव-सुरक्षा परिघात राहूनही काही खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे ४ मे रोजी ‘आयपीएल’ स्थगित करण्यात आली. त्यामुळे उर्वरित ३१ सामने खेळवण्यासाठी ‘बीसीसीआय’ने अमिरातीचा पर्याय निवडल्याचे समजते.

‘‘बीसीसीआयने सर्व भागधारक आणि प्रक्षेपणकर्त्यांशी केलेल्या संवादानंतर १८ ते २० सप्टेंबरपैकी कोणत्याही एका दिवशी ‘आयपीएल’ सुरू होईल. १० ऑक्टोबर किंवा त्यापूर्वीच अंतिम सामना खेळवण्यात येईल. यादरम्यान तीन आठवडे उपलब्ध असल्याने जवळपास १० दिवशी प्रत्येकी दोन सामने होतील,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले. याविषयी लवकरच अंतिम घोषणा करण्यात येईल, असेही त्याने नमूद केले.

भारतीय संघाचा इंग्लंड दौरा १४ सप्टेंबर रोजी संपणार असून त्यानंतर सर्व खेळाडूंना विशेष विमान सेवा पुरवून अमिरातीत आणले जाईल. ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धासुद्धा भारताऐवजी अमिरातीत खेळवण्यात येण्याची शक्यता असल्याने ‘आयपीएल’चे त्यापूर्वी आयोजन करणे सोयीस्कर ठरू शकते.

अमिरातीतील मैदानांसाठी चुरस

संयुक्त अरब अमिरातीत फ्रँचायझी तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करण्यासाठी ‘बीसीसीआय’व्यतिरिक्त पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) यांच्यातही स्पर्धा सुरू आहे. पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित सामने जूनमध्ये अमिरातीत होणार असून त्यानंतर न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीही तेथेच होणार आहेत. त्यातच विश्वचषकही भारताऐवजी अमिरातीत खेळवण्याचा निर्णय ‘आयसीसी’ने घेतल्यास १ ऑक्टोबपर्यंत सर्व मैदाने ‘आयसीसी’ला सोपवावी लागतील. अशा स्थितीत ‘आयपीएल’च्या सामन्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होईल.