ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या आगामी टी२० विश्वचषकापूर्वी आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने क्रिकेटच्या नियमात काही मोठे बदल केले जाणार अशी घोषणा केली आहे. यामध्ये स्ट्राईक घेण्यापासून ते डेड बॉल, नो बॉल, पेनल्टी धावांपर्यंत अनेक मुद्यांवर नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासोबतच कोविड-१९ च्या काळापासून सुरू झालेली लाळ बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व नवीन नियम १ ऑक्टोबरपासून लागू होतील. या बदलांसाठीच्या सूचना मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) मांडल्या आहेत. साधारणपणे, आयसीसी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मेरीलेबोन क्रिकेट क्लबने सुचविलेले प्रत्येक नियम जसेच्या तसे लागू करते. असेच काहीसे यावेळीही पाहायला मिळाले. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखालील पुरुष क्रिकेट समितीने एमसीसी मधील २०१७ च्या क्रिकेट नियमांच्या अद्ययावत तिसऱ्या आवृत्तीतील खेळण्याच्या अटींमध्ये बदल करण्याची शिफारस केली.