भेदक मारा करत लसिथ मलिंगाने पटकावलेले बळींचे पंचक आणि सलामीवीर लहिरु थिरीमानेचे शतक यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेने आशिया सम्राट होण्याचा मान पटकावला. स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानवर पाच विकेट्स आणि २२ चेंडू राखत श्रीलंकेने विजय मिळवला. २००८ नंतर यावर्षी आशिया चषकाला गवसणी घालण्यात स्पर्धेत अपराजित राहिलेल्या श्रीलंकेला यश आले. पाकिस्तानचा अर्धा संघ गारद करणाऱ्या मलिंगाला सामनावीराचा, तर या सामन्यासह मालिकेत दुसरे शतक झळकवणाऱ्या थिरीमानेला मालिकावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला अर्धशतकी सलामी मिळाली, पण कुशल परेरा (४२) आणि फॉर्मात असलेल्या कुमार संगकाराला शून्यावर गमावल्याने पाकिस्तान वरचढ होईल असे वाटत होते. पण थिरीमाने आणि महेला जयवर्धने यांनी तिसऱ्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी रचत संघाला विजय विजयासमीप नेले. जयवर्धनेने ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७५ धावांची खेळी साकारली. थिरीमानेने तब्बल १३ चौकारांच्या जोरावर १०१ धावांची खेळी साकारली. शतक झाल्यावर थिरीमानेला जास्त धावा करता आल्या नाहीत, पण बाद होईपर्यंत त्याने संघाला विजयासमीप पोहोचवले होते.
तत्पूर्वी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण मलिंगाने पहिल्या षटकापासूनच पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडण्याचे काम केले. पहिल्या षटकापासूनच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत मलिंगाने पाकिस्तानची ३ बाद १८ अशी दयनीय अवस्था केली. यावेळी जर मलिंगाला अन्य गोलंदाजांची साथ लाभली असती, तर कदाचित पाकिस्तानचा संघ ढेपाळू शकला असता, पण अन्य गोलंदाजांना पाकिस्तानच्या फलंदाजांना चकवा देता आला नाही आणि याचाच फायदा फवाद आलम आणि मिसबाह यांनी उचलला या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. ही जोडी मोठय़ा धावसंख्येच्या दिशेने कूच करत असताना श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने पुन्हा एकदा मलिंगाच्या हाती चेंडू सोपवला आणि त्यानेही कर्णधाराला निराश न करता मिसबाहला बाद करत ही जोडी फोडली. मिसबाहने ३ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६५ धावांची संयमी खेळी साकारली. मिसबाह बाद झाल्यावर उमर अकमलने आलमच्या साथीने अखेरच्या हाणामारीच्या षटकांमध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. अकमलने ४२ चेंडूंमध्ये ७ चौकारांच्या जोरावर ५९ धावांची खेळी साकारत आलमला चांगली साथ देत संघाला अडीचशे धावांचा पल्ला गाठून देण्यात मोलाचा वाटा उचलला. जहाज अडचणीत सापडल्यावर ज्या पद्धतीने नांगर वाचवतो, तशीच खेळी आलमने अंतिम फेरीत केली. त्याने पाकिस्तानला फक्त स्थैर्य मिळवून दिले नाही, तर धावसंख्येला चांगला आकार देत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
धावफलक
पाकिस्तान : शरजील खान झे. थिसारा परेरा गो. मलिंगा ८, अहमद शेहझाद झे. संगकारा गो. मलिंगा ५, मोहम्मद हफिझ झे. संगकारा गो. मलिंगा ३, मिसबाद-उल-हक झे. कुशल परेरा गो. मलिंगा ६५, फवाद आलम नाबाद ११४, उमर अकमल झे. प्रियांजन गो. मलिंगा ५९, शाहिद आफ्रिदी नाबाद ०, अवांतर (लेग बाइज १, वाइड ५) ६, एकूण ५० षटकांत ५ बाद २६०.
बाद क्रम : १-८, २-१७, ३-१८, ४-१४०, ५-२५५.
गोलंदाजी : लसिथ मलिंगा १०-०-५६-५, सुरंगा लकमल १०-२-४१-०, सचित्र सेनानायके ९-०-५४-०.
थिसारा परेरा १०-१-६६-०, अँजेलो मॅथ्यूज ७-१-२३-०, पी सी डी’सिल्व्हा ४-०-१९-०.
श्रीलंका : कुशल परेरा यष्टिचीत अकमल गो. अजमल ४२, लहिरू थिरीमाने त्रि. गो. अजमल १०१, कुमार संगकारा पायचीत गो. अजमल ०, महेला जयवर्धने झे. शोरजील गो. ताला ७५, अशान प्रियंजन झे. अकमल गो. जुनैद खान १३, अँजेलो मॅथ्यूज नाबाद १६, पी सी डी’सिल्व्हा नाबाद ६, अवांतर (बाइज १, लेग बाइज १, वाइड ५, नो बॉल १) ८, एकूण ४६.२ षटकांत ५ बाद २६१.
बाद क्रम : १-५६, २-५६, ३-२१२, ४-२३३, ५-२४७.
गोलंदाजी : मोहम्मद हफिझ ९-०-४२-०, उमर गुल ६-०-४४-०, जुनैद खान ९-०-५६-१, सइद अजमल १०-२-२६-३, मोहम्मद ताला ६.२-०-५६-१, शाहिद आफ्रिदी ६-०-३५-०.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thirimanne ton malinga fifer take sri lanka to title
First published on: 09-03-2014 at 06:56 IST