Turning Point Of Australia vs South Africa WTC Final: दक्षिण आफ्रिका संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर इतिहास घडवला आहे. १९९८ नंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेने आयसीसीसी ट्रॉफी उंचावली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २८२ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीला २ मोठे धक्के बसले. पण त्यानंतर कर्णधार तेंबा बावूमा आणि एडेन मारक्रमने शतकी भागीदारी करत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. यादरम्यान स्टीव्ह स्मिथने केलेली एक चूक ऑस्ट्रेलियाला चांगलीच महागात पडली.
स्टीव्ह स्मिथने केलेली एक चूक ऑस्ट्रेलियाला महागात पडली
दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात २८२ धावांचा पाठलाग करायचा होता. हे आव्हान मुळीच सोपं नव्हतं. कारण कसोटी क्रिकेटच्या इतिहासात लॉर्ड्सच्या मैदानावर २८२ ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. या धावांचा पाठलाग करताना तेंबा बावूमाने पहिल्या दिवशी शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने एडेन मारक्रमला चांगली साथ दिली. दोघांनी शतकी भागीदारी केली. यादरम्यान स्टीव्ह स्मिथने तेंबा बावूमाचा सोपा झेल सोडला.
तर झाले असे की, दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू असताना २० वे षटक टाकण्यासाठी मिचेल स्टार्क गोलंदाजीला आला. चेंडू उसळी घेत नव्हता. त्यामुळे स्लीपमध्ये असलेले क्षेत्ररक्षक हेल्मेट घालून फलंदाजाच्या अगदी जवळ उभे होते. मिचेल स्टार्कने टाकलेला चेंडू तेंबा बावूमाच्या बॅटला लागून इतक्या वेगाने आला की, स्मिथला गतीचा अंदाज घेता आला नाही. त्यामुळे हा सोपा झेल सुटला आणि दुखापतग्रस्त झाल्यामुळे स्मिथला मैदान सोडावं लागलं. ज्यावेळी हा झेल सुटला त्यावेळी तेंबा बावूमा अवघ्या २ धावांवर फलंदाजी करत होता. हा झेल पकडला असता तर सामन्याचं चित्र काही वेगळं असू शकलं असतं.
या धावांचा पाठलाग करताना एडेन मारक्रम आणि रायन रिकल्टनची जोडी मैदानावर आली. या जोडीकडून चांगल्या सुरूवातीची अपेक्षा होती. मात्र रायन रिकल्टन अवघ्या ६ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मुल्डर आणि मारक्रम यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला दमदार कमबॅक करून दिलं. तिसऱ्या दिवसाअखेर एडेन मारक्रम शतकी खेळी करत माघारी परतला. तर तेंबा बावूमाने अर्धशतकी खेळी करत नाबाद माघारी परतला.