भारतात सुरू असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामावर सध्या करोनाचे सावट गडद होत चालले आहे. कोलकाता संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर आता चेन्नई सुपर किंग्जच्या (सीएसके) संघातही करोनाने ‘एन्ट्री’ घेतली आहे. चेन्नईच्या तीन सदस्यांना करोनाची लागण झाली आहे.

Espn Cricinfoने दिलेल्या वृत्तानुसार, सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बसचा क्लीनर यांना करोनाने ग्रासले आहे. याव्यतिरिक्त दिल्लीत असलेला उर्वरित संघ करोना चाचणीत निगेटिव्ह आढळला आहे. या सर्वांची शेवटची चाचणी रविवारी घेण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल आता समोर आला आहे.

या चाचणीनंतर काशी विश्वनाथ, बालाजी आणि बसचा क्लीनर यांनी आज सोमवारी पुन्हा करोना चाचणी केली, यात ते पुन्हा पॉझिटिव्ह आढळले तर त्यांना संघाच्या बायो-बबलच्या बाहेर १० दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीत राहावे लागेल. दोन निगेटिव्ह चाचण्या येईपर्यंत त्यांना संघात प्रवेश मिळणार नाही.

भारताचा माजी वेगवान गोलंदाज बालाजी चेन्नई संघासमवेत होता. शनिवारी मुंबई इंडियन्ससोबत झालेल्या अटीतटीच्या सामन्यात तो डगआऊटमध्ये होता. तर, विश्वनाथ यांच्या पत्नीला आयपीएलच्या मागील हंगामात करोनाने ग्रासले होते.

कोलकाता-बंगळुरू सामना स्थगित

आयपीएल २०२१स्पर्धेत आज कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार होता. मात्र या सामन्यापूर्वी दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याने सामना पुढे ढकलण्यात आला आहे. करोनामुळे खेळाडूंच्या गोटात भीतीचे वातावरण पसरले आहे. आयपीएल स्पर्धा करोनाच्या सावटाखाली होत असल्याने खेळाडू बायो बबलमध्ये खेळत आहेत. तसेच कडक नियमावली लागू करण्यात आली. अशात खेळाडूंना करोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरीयर या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे.