Tilak Varma on Asia Cup Trophy 2025 Controversy: आशिया चषक २०२५ ट्रॉफीवरून वाद अजूनही सुरूच आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी काही भारताला ट्रॉफी देण्यासाठी तयार नाहीत. आता हा ट्रॉफी प्रकरणातील वाद बीसीसीआयने थेट आयसीसीच्या कोर्टात नेणार असल्याचं चित्र आहे. यादरम्यान भारताच्या आशिया चषक फायनल विजयाचा हिरो तिलक वर्माने मैदानावर नेमकं काय घडलं होतं, हे सांगितलं.
भारताच्या आशिया चषक जेतेपदाचा हिरो तिलक वर्माने ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या गौरव कपूरच्या पोडकास्टसाठी उपस्थित राहिला होता. यादरम्यान त्याने क्रिकेट कारकिर्द रोहित शर्माबरोबर पहिला संवाद, त्याच्या लेकीबरोबरचं नातं आणि आशिया चषक ट्रॉफी दरम्यानच्या वादाबाबत मोकळेपणाने गप्पा मारल्या.
तिलक वर्माने या मुलाखतीदरम्यान भारतीय संघाने ट्रॉफीसाठी एक तासाहून अधिक वाट पाहिली, परंतु ट्रॉफी मिळाली नाही. सामन्यानंतर, भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, जे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री देखील आहेत. त्यानंतर ते ट्रॉफी घेऊन स्टेडियममधून निघून गेले.
आशिया चषक ट्रॉफी ड्रामाबाबत तिलक वर्मा नेमकं काय म्हणाला?
तिलक वर्मा म्हणाला, “आम्ही मैदानावर तासभर वाट पाहिली. तुम्ही ते टीव्हीवर पाहिलं असेलच; मी जमिनीवर पडलो होतो. अर्शदीप सिंग रील बनवत होता. आम्हाला ट्रॉफी येईल अशी आशा होती, पण ट्रॉफी कुठेच दिसली नाही.”
तिलकने खुलासा केला की खेळाडूंनी आपापसात यावर चर्चा केली आणि ठरवलं की जर त्यांना ट्रॉफी नाही मिळाली तरी जल्लोष मात्र झालाच पाहिजे. तिलक पुढे म्हणाला, “अर्शदीपने सांगितलं, चला ट्रॉफीचा माहोल तयार करूया. टी२० विश्वचषक २०२४ मध्ये आपण जसा जल्लोष केला होता तसाच जल्लोष करू, ट्रॉफी नसली तरी चालेल. अभिषेक शर्मा आणि इतर पाच-सहा खेळाडू तयार झाले आणि आम्ही तसाच जल्लोष केला.”
भारताचा आशिया चषकमधील पाकिस्तानवरचा तिसरा विजय होता, ज्याने पुन्हा एकदा त्यांचे वर्चस्व सिद्ध केलं तिलक वर्माने सामन्याबाबत बोलताना सांगितलं, “आमचा संघ आत्मविश्वासू होता, पण क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. एक वाईट दिवस आणि सगळं संपलं. मी पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात जसा खेळलो, तशी खेळी मी रोज खेळू शकत नाही.”
