वृत्तसंस्था, डार्विन

टीम डेव्हिडच्या (५२ चेंडूंत ८३ धावा) झंझावाती खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने रविवारी झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी मात केली. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी मिळवली.

अडखळत्या सुरुवातीनंतर डेव्हिडच्या आक्रमक खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने २० षटकांत १७८ धावांची मजल मारली. आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत ९ बाद १६१ धावाच करता आल्या. रायन रिकल्टन (५५ चेंडूंत ७१) आणि ट्रिस्टन स्टब्स (२७ चेंडूंत ३७) यांचे प्रयत्न अपुरे पडले. ऑस्ट्रेलियाकडून बेन ड्वारशस (३/२६) आणि जोश हेझलवूड (३/२७) या वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. मधल्या षटकांत अॅडम झॅम्पाची (२/३३) फिरकीही प्रभावी ठरली.

त्याआधी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीचे आमंत्रण दिले. ऑस्ट्रेलियाची ३ बाद ३० अशी स्थिती होती. त्यावेळी कॅमरुन ग्रीनने (१३ चेंडूंत ३५) फटकेबाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. परंतु चांगल्या सुरुवातीनंतर तो बाद झाला. यानंतर डेव्हिडने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने आठ उत्तुंग षटकार आणि चार चौकारांच्या साहाय्याने ८३ धावा फटकावत ऑस्ट्रेलियाला १७० धावांचा टप्पा ओलांडून दिला. दक्षिण आफ्रिकेच्या क्वेना मफाकाने (४/२०) भेदक मारा केला.